
मराठा समाजाला बेळगावातील मुस्लिम, ख्रिश्चन आणि अठरापगड जातींनी दिलेला पाठिंबा हे मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. एकही घोषणा नाही. राजकीय नेत्यांची भाषणे नाहीत. सुमारे दहा लाखांची उपस्थिती असतानाही कोठेही गालबोट नाही. मूक मोर्चातून न बोलताही सीमावासीयांनी आपल्या सुप्त शक्तीचा परिचय करून दिला. गुरुवारच्या मोर्चाला बेळगाव सीमाभागासह कोल्हापूर, सांगली, गोवा, चंदगड, बागलकोट, विजापूर आदी भागातून तब्बल दहा लाख मराठी बांधवांनी ‘न भूतो; न भविष्यति’ अशी विराट उपस्थिती दर्शविली.
मोर्चासाठी बेळगाव आणि सीमाभागातील मराठी समाजबांधवांनी बुधवारी रात्र जागून काढली. प्रत्येकाला गुरुवारच्या मोर्चाचे वेध लागले होते. त्यामुळे पहाटेपासून लोकांचे जथ्थे बेळगावकडे येत होते. हातात भगवे ध्वज, निषेधांचे व मागण्यांचे फलक, भगव्या टोप्या, वेधक टी-शर्ट घालून येणारे जथ्थे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी सकाळपासूनच गल्लोगल्लीत कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. आठ वाजल्यानंतर शहरात येणार्या प्रत्येक मार्गावर वाहनांची गर्दी वाढू लागली.
मोर्चाला शहराच्या चोहोबाजूंनी येणार्या वाहनांसाठी नियोजित मार्गाने कार्यकर्त्यांची वाहने पार्किंगस्थळी वळविण्यात येत होती. मोर्चाला छ. शिवाजी उद्यान येथून प्रारंभ होणार असल्याने शहरातील विविध ठिकाणी वाहने लावून कार्यकर्ते उद्यानाकडे निघाले होते. उद्यानात सकाळपासूनच प्रचंड गर्दी झाली होती. दहा वाजता छ. शिवाजी उद्यान आणि एसपीएम रोड गर्दीने फुलून गेला होता. मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर नव्याने बांधण्यात आलेला उड्डाणपूल गर्दीने ओव्हरफ्लो झाला. मोर्चा पुढे सरकत असता मागून येणार्यांची गर्दी क्षणोक्षणी वाढत होती. याचवेळी नियोजित मार्गावरून पुढे जाता न आल्यामुळे अकरा वाजल्यापासून धर्मवीर संभाजी चौकात कार्यकर्त्यांची गर्दी वाढली होती. अनेक कार्यकर्ते वेळेपूर्वीच चौकात ठाण मांडून बसले होते. संपूर्ण धर्मवीर संभाजी चौकात भगव्याची लाट पसरली होती. सकाळी ठीक 10 वा. रणरागिणी वैष्णवी कडोलकर, गौतमी उघाडे, मथुरा कुंडेकर, प्रांजल धामणेकर, सोनम पाटील यांच्या हस्ते शिवाजी उद्यानमधील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी या ठिकाणी उभारलेल्या व्यासपीठावर या रणरागिणींची मराठा समाजाचा उत्साह वाढविणारी जोशपूर्ण भाषणे झाली.शिवाजी उद्यान येथून निघालेला मोर्चा एसपीएम रोड, कपिलेश्वरजवळील उड्डाण पूल, शनिमंदिर, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली. संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, यंदे खूट, कॉलेज रोडमार्गे ध. संभाजी चौकाकडे निघाला असता शहरातील विविध मार्गांवरून कार्यकर्ते येऊन सामील होत होते. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चात कार्यकर्त्यांचा सहभाग जसजसा वाढू लागला तसतसा संपूर्ण मोर्चामार्ग गर्दीने तुडुंब झाला. त्यामुळे लाखो कार्यकर्त्यांना संभाजी चौकात येण्यास जागाच उरली नव्हती.कोणतीही घोषणा नाही, टाळ्या नाहीत, शिट्ट्या नाहीत, कसल्याही प्रकारची हुल्लडबाजी नाही अशा शिस्तबद्ध वातावरणात निघालेल्या मोर्चात हातात केवळ भगवा ध्वज, डोक्यावर भगवी टोपी आणि भगवा फेटा, अंगावर भगवे उपरणे, सीमाप्रश्न आणि मराठी भाषिकांच्या प्रश्नाची जाण करून देणारे टीशर्ट आदींसह मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकर्यांना न्याय द्या, कोपर्डी येथील नराधमांना फाशी द्या, सीमाप्रश्न तात्काळ सोडवा, अशा मागण्यांचे हातातील फलक उंचावत मोर्चा शांतपणे पुढे सरकत होता. लाखो लोक मोर्चात सहभागी झाले असतानाही मोर्चा नि:शब्द होता. प्रत्येकाच्या चेहर्यावर स्वाभिमानाची छटा होती.
Leave a Reply