
मुंबई: शिवजयंती म्हणजे तमाम महाराष्ट्राच्या अभिमानाचा दिवस. हिंदवी-स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवरायांना स्टार प्रवाह अनोख्या पद्धतीनं मानाचा मुजरा करणार आहे. शिवजयंतीच्या दिवशी, शिवप्रेमींना रविवार १९ फेब्रुवारीला दुपारी १ ते सायंकाळी ४ या वेळेत गाजलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेचे भाग सलग पाहता येणार आहेत.
‘अनमोल ठेवा’ या संकल्पनेअंतर्गत ‘राजा शिवछत्रपती’ ही गाजलेली लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा स्टार प्रवाहवर प्रसारित होणार ही बातमी सोशल मीडिया आणि माध्यमांतून सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. त्या प्रभावामुळे पहिल्या भागापासून या मालिकेला मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आहे. त्यामुळे एवढ्या वर्षांनंतरही ही मालिका प्रत्येक मराठी प्रेक्षकाच्या मनात घर करून असल्याचं स्पष्ट झालं आहे. या अभूतपूर्व प्रतिसादामुळे यंदाच्या शिवजयंती दिवशी रविवार १९ फेब्रुवारीला राजा शिवछत्रपती मालिकेचे मागच्या आठवड्यात दाखवण्यात आलेले सर्व भाग पुन्हा दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवप्रेमींना स्वराज्याच्या निर्मितीचा धगधगता संघर्ष आणि इतिहासातली सोनेरी पानं पुन्हा अनुभवता येणार आहेत.
सध्या ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ९ :३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जात आहे. या मालिकेतील कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मालिकेच्या पुन:प्रसारणाविषयी आनंद व्यक्त केला आहे. ‘आठ वर्ष कशी उलटून गेली कळलंच नाही. आज पुन्हा आठवणींची गर्दी झाली मनात. राजा शिवछत्रपती या मालिकेन खूप काही दिलं. पण आणखी एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे उत्तम संचित गाठीशी घेऊन झेपावण्याची हीच ती वेळ! नवं क्षितिज खुणावतंय. इतिहास आपोआप घडत नसतो; उरातील हिंमतीवर अन् मनगटातील ताकदीवर तो ‘घडवावा’ लागतो,’ अशा शब्दांत शिवराय साकारलेले अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याशिवाय जिजाऊंची अविस्मरणीय भूमिका केलेल्या मृणाल कुलकर्णीने ही संस्मरणीय गोष्ट असल्याची पोस्ट केली होती. या दोन्ही पोस्ट पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव झाला होता.
मालिकेचं प्रसारण सुरू झाल्यापासून प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यात काही प्रेक्षकांकडून ही मालिका इतिहासाच्या भव्यतेचा प्रत्यय देणारी असल्याचं सांगितलं जात आहे. तर, काही प्रेक्षक नव्या पिढीला शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सांगण्यासाठी ही मालिका उपयुक्त असल्याचं म्हणत आहेत.
Leave a Reply