
कोल्हापूर :- जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी एकूण 76.85 टक्के मतदान झाले असून उद्या सकाळी 10 वाजता निश्चित केलेल्या मतमोजणीच्या ठिकाणी मतमोजणीस प्रारंभ होणार असून लवकरात लवकर मतमोजणी पूर्ण करण्यासाठी यंत्र सज्ज केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे बोलताना दिली.
मतमोजणी प्रक्रियेत सुरुवातीला पोस्टाच्या मतांची मोजणी केली जाणार असून त्याचबरोबर ईव्हीएम मशिनचीही मतमोजणीची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे 900 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून इव्हीएम मशिनबाबत तज्ञ टीमही प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तैनात केली आहे. मतमोजणीसाठी मतमोजणीच्या ठिकाणी तसेच परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले.
मतमोजणीसाठी प्रत्येक तालुक्यात आवश्यकतेनुसार मतमोजणी टेबल तयार करण्यात आले असून टपाली मतपत्रिकेसाठीही स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणीसाठी निश्चित केलेली टेबलची संख्या पुढील प्रमाणे आहे. कंसातील अंक टपाली मतपत्रिकेसाठीच्या टेबलांची संख्या दर्शवितात. करवीर तालुक्यातील मतमोजणीसाठी टेबलची संख्या 35 (1), गगनबावडा-12 (1), पन्हाळा-24 (2), शाहूवाडी-25 (1), राधानगरी-21 (1), कागल-24 (2), हातकणंगले 24 (2), शिरोळ 19 (1), भुदरगड-27 (2), आजरा 16 (2), गडहिंग्लज 34 (4) आणि चंदगड तालुक्यात मतमोजणीसाठी 12 टेबल आणि टपाली मतपत्रिकेसाठी 4 टेबलची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी 67 गटासाठी आणि पंचायत समितीच्या 134 गणांसाठी काल झालेले मतदानामध्ये 76.85 टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी अशी शाहूवाडी तालुक्यात 75.95, पन्हाळा 82.26, हातकणंगले- 77.37, शिरोळ-75.10, कागल-84.94, करवीर-76.13, गगनबावडा-88.44, राधानगरी-81.38, भुदरगड-75.93, आजरा-70.04, गडहिंग्लज-70.59 आणि चंदगड तालुक्यात 69.36 इतके टक्के मतदान झाले.
Leave a Reply