कोल्हापूर:झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजली ही पात्रं आज प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली या दोघांच्या प्रेमकथेने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलेलं आहे. यांच्या प्रेमकथेची सुरुवात, राणाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, अंजलीला भावलेला त्याचा साधेपणा या सर्व गोष्टींमध्ये प्रेक्षक समरसुन गेला आणि आता सर्वांना वेध लागले आहेत ते या दोघांच्या लग्नाचे. राणाने अंजलीकडे आपलं प्रेम व्यक्त केलं आणि लग्नाची मागणी घातल्यानंतर या गोष्टीने नवं वळण घेतलं आहे. दोघांच्याही घरी लग्नाची तयारी, खरेदीची लगबग सुरु झाली आहे. ही लगीनघाई प्रेक्षकांना सध्याच्या भागांमधून बघायला मिळतेय आणि आता या दोघांचं लग्न बघायला मिळणार आहे दोन तासांच्या विशेष भागामधून. येत्या रविवारी ५ मार्चला सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हा विवाह विशेष भाग झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.
कोल्हापुरजवळच्या छोट्याशा गावात राहणारा, प्रतिष्ठीत आणि सधन कुटुंबातील असला तरी मातीशी जोडलेला, तालमीतला पहेलवान असला तरी बायकांशी बोलताना घाबरणारा राणादा सर्वांनाच मनापासून भावतोय. राणादा इतकीच लोकप्रिय झालीये ती अंजली. मैत्रीपासून सुरु झालेली दोघांची गोष्ट प्रेमापर्यंत कधी आली ते त्यांनाही कळलं नाही आणि आता या प्रेमाला लग्नाचं कोंदण लागणार आहे. राणादा आणि अंजलीबाईंच्या लग्नासाठी सारं गाव सज्ज झालं आहे. प्रत्येक घरात लग्नाचाच विषय आणि उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अशीच उत्सुकता प्रेक्षकांनाही आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. या दोघांच्या लग्नामुळे सर्व आनंदी असले तरी नंदितावहिनीच्या मनात मात्र वेगळाच कट शिजतोय. घरात थोरली सून आल्यानंतर आपलं महत्त्व कमी होईल आणि सगळी सूत्रं अंजलीकडे जातील याची भीती तिला वाटतेय आणि याचसाठी ती वेगळी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात आहे. नंदिता वहिनीचे अशा प्रकारचे डावपेच भोळ्या स्वभावाच्या राणाला कळत नाही आणि त्याच्या याच स्वभावाचा फायदा घेण्याचा डाव नंदिताने आखला आहे. या लग्नामध्ये विघ्न आणण्यासाठी ती कोणती नवी खेळी खेळणार ? यामध्ये ती यशस्वी होईल का ? राणा आणि अंजलीचं लग्न सुरळीत पार पडेल का ? हे बघणं उत्सुकतेचं ठरेल.
लग्नातून देणार साधेपणाचा संदेश: गावाकडचं लग्न म्हटलं की रंगरंगोटी, रोषणाई, आतषबाजी, मान मरताब या गोष्टी ओघाने येतातच आणि सोबत येतो तो त्यावर होणारा भरमसाठ खर्च. सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्न सोहळ्यावर अमाप खर्च करण्याची पद्धत गावांत, शहरांत सगळीकडेच आहे. हा अवाजवी खर्च खरंच एवढा गरजेचा असतो की साधेपणानेसुद्धा लग्नसमारंभ पार पडू शकतात असाच काहीसा संदेश राणा-अंजलीच्या लग्नातून देण्यात येणार आहे. राणाची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची सधनता, गावात असलेली प्रतिष्ठा हे सगळं मोठं असलं तरी हे लग्न मात्र ते अत्यंत साध्या पद्धतीने लागणार आहे.
Leave a Reply