
कोल्हापूर : अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विविध घटनांमध्ये सुमारे तिघा भारतीयांवर अमेरिकी हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. त्यामध्ये दोन भारतीय मृत्युमुखी पडले आहेत तर एक गंभीर जखमी झाले आहेत. वंशभेदावरून चाललेली ही क्रूरता कोणत्याही परिस्थिती मध्ये खपवून घेणार नाही. भारतीयांवर अन्याय कराल तर जशास तसे उत्तर शिवसैनिक देतील, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. अमेरिकेत होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात आज शिवसेनेने अमेरिकेच्या ध्वजाचे दहन केले.
आज सकाळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक छ. शिवाजी चौक येथे जमले. याठिकाणी “जय भवानी जय शिवाजी”, “अमेरिका सरकारचा धिक्कार असो”, “अमेरिकेची गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही”, “डोनाल्ड ट्रम्प चा धिक्कार असो”, अशा निषेधाच्या घोषणा देत छ. शिवाजी चौक परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, अमेरिका राष्ट्रास प्रगत करण्यामागे ज्या भारतीय नागरीकांचा मोलाचा वाटा आहे अशा भारतीय वंशाच्या नागरिकांवर अमेरिकेतील विकृतांकडून जीवघेणे हल्ले होत आहेत. या हल्ल्यामध्ये दोन निष्पाप भारतीयांचा बळी गेला आहे. आजच्या घडीला अमेरिकेमध्ये अध्यक्षांच्या सचिव पदाच्या हुद्द्यापासून नासा मधील संशोधक, डॉक्टर, इंजिनिअर्स, उद्योगपती अशा मोठ्या पदावर भारतीय वंशाचे नागरिक काम करीत आहेत. त्यांच्या योगदानामुळेच आज अमेरिका प्रगत राष्ट्रांमध्ये गणली जाते. या भारतीयाना सन्मानाची वागणूक देणे अमेरिकेच्या नागरिकांची जबाबदारी असताना भारतीयांवर हल्ले घडवून अमेरिका सरकार आपल्या क्रूरतेचे दर्शन घडवीत आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने तातडीने भारतीय नागरिकांना संरक्षण पुरवावे, होणारे हल्ले थांबवावेत, अन्यथा आजपर्यंत “अथिथी देवो भव” या भारतीय संकृतीच्या आश्रयामुळे भारतात ठाण मांडून राहत असलेल्या अमेरिका वंशाच्या नागरिकांना भारतातून हद्दपार करू, असा इशाराही आमदार राजेश क्षीरसागर यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून दिला. त्याचबरोबर भारतीय नागरिकांवर होत असलेले हल्ले तातडीने थांबविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने आणि परराष्ट्र मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष द्यावे, या करिता सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे मागणी करणार असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यानी सांगितले. यानंतर शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने या घटनांमध्ये बळी पडलेल्या निष्पाप भारतीयाना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी परिवहन सभापती नियाज खान, माजी नगरसेवक राजेंद्र पाटील, दीपक गौड, महिला आघाडीच्या सौ. मंगल साळोखे, सौ. मेघना पेडणेकर, सौ. गौरी माळद्कर, कु. रुपाली कावळे, युवा सेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, अविनाश कामते, माथाडी सेनेचे शहरप्रमुख राज जाधव, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, अनिल पाटील, किशोर घाटगे, धनाजी दळवी, पद्माकर कापसे, विश्वजित मोहिते, अजित गायकवाड, निलेश हंकारे, ओमकार परमणे, कपिल सरनाईक, अश्विन शेळके, मंदार तपकिरे, सचिन भोळे, अरुण सावंत, सनी अतिग्रे, सुरज जाधव, कमलाकर किलकिले, शैलेश साळोखे, सौरभ कुलकर्णी, गोविंद वैदू, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply