
कोल्हापूर – आपल्या मुलींचे कलागुण, कौशल्य ओळखून त्यादृष्टीने प्रत्येक मातेने तिच्यात विश्वास निर्माण करायला हवा तसेच तिला प्रोत्साहन द्यायला हवे. आजच्या काळातील महिला सक्षम झाली आहे. आणि त्यामुळेच पुढच्या पिढीलाही सक्षम करण्याची तिची खरी जबाबदारी आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत शाहू स्मारक येथे आयोजित जागतिक महिला दिन व महिला मतदार जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. अंशू सैनी, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धीबळपटू ऋचा पुजारी, भरतनाट्यम नृत्यात जागतिक विक्रमाची गिनीज बुकात नोंद असलेल्या नृत्यांगना संयोगिता पाटील, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उजिल्हानिवडणूकिकारी रवीद्र खाडे, गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी संगीता चौगुले, आजरा-भुदरगड उपविभागीय अधिकारी कीर्ती नलावडे, निवडणूक तहसीलदार सुचित्रा आमले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आपल्याकडे कुटुंबात मुलगी जन्माला आली की सगळ्यात आधी तिच्या लग्नाची काळजी वाटू लागते आणि त्यादृष्टीने तिच्यासाठी गुंतवणूक केली जाते. मात्र समाजाची ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आपल्या मुलीला सक्षम करणे, तिच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि एक व्यक्ती म्हणून तिच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास कसा होईल, यासाठी प्रयत्न करणे जास्त महत्वाचे आहे. पुरोगामी विचारांची आणि कलेची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात जागतिक दर्जाची बुद्धिबळपटू ऋचा पुजारी आणि नृत्यांगना संयोगिता पाटील घडल्या आहेत, हा आपला सन्मान आहे. भविष्यात अशाच अनेक ऋचा आणि संयोगिता घडल्या पाहिजेत, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असे मतही याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. अंशू सैनी म्हणाल्या, आजच्या काळात महिलांचे झपाट्याने सक्षमीकरण होत असले तरी समाजात दिवसेंदिवस होत असलेले महिलांवरील अत्याचारही वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. एकीकडे आपण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांचे कौतुक करतो, तिला देवीचे स्थान देतो, तर दुसरीकडे सुरक्षतेच्या नावाखाली तिला घराबाहेर पडण्यावर निर्बंध करतो, मुलींना ती जन्माला येण्याआधी तिची गर्भातच हत्त्या केली जाते, हीचिंतेची बाब असून स्त्रीभृण हत्या रोखण्यासाठी संपूर्ण समाजाने सक्रीय व्हावे.
Leave a Reply