
मुंबई:देशाच्या मानव संसाधनात 50टक्के महिलांना प्रशिक्षण देऊन सहभागी करून घेतले आणि त्या अर्थव्यवस्थेचा भाग झाल्या तर देशाची प्रगती झपाट्याने होते. त्यामुळे राज्य शासन महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना राबविण्यास प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभाग आणि ग्राम विकास विभागाच्या वतीने आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, महिला व बाल विकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंघल, ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापक कुसुम बाळसराफ आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी विभागाच्या वतीने मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘रेंट अ होम’ या संकेतस्थळाचे अनावरण, माझी कन्या भाग्यश्री योजनेतील दोन लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप, इलेक्ट्रॉनिक फिजिओ ग्रोथ मॉनिटिरिंग सिस्टिम (ईपीजीएमएस) चे उद्घाटन, तसेच उमेद कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणींना रोजगार नियुक्ती पत्र वाटप, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार, तसेच सुमतीबाई सुकळीकर योजनेअंतर्गत दोन महिला स्वयंसहाय्यता गटांना कर्जाच्या धनादेशाचे वाटप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
Leave a Reply