
कोल्हापूर: शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू होणारा जेम्स अँड ज्वेलरी अभ्यासक्रम सुवर्ण व्यवसायाला आशेचा किरण ठरेल, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी व्यक्त केले.येथील शासकीय तंत्रनिकेतन आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या माध्यमातून येत्या शैक्षणिक वर्षापासून जेम्स अँड ज्वेलरी अभ्यासक्रमाच्या अंतर्गत विविध वर्ग सुरू होत आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे पदाधिकारी आणि संचालक मंडळाने शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू असणाऱ्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना ओसवाल बोलत होते.ते म्हणाले, शासकीय तंत्रनिकेतन आणि आपल्या सहयोगाने सुरू होणाऱ्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपणाला हवा असणारा कुशल कारागीर तर मिळेलच शिवाय आपल्या व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकारचे अभ्यासक्रम येथे असल्यामुळे येथून बाहेर पडणारी पिढी सक्षमपणे येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करेल.
राज्य शासनाच्या वतीने 50 लाखांचा निधी यासाठी उपलब्ध झाला आहे. त्या अनुषंगाने प्राचार्य प्रशांत पट्टलवार आणि शशांक मांडरे यांनी कशा प्रकारची शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिली जाईल,कोणते अभ्यासक्रम आपण सुरू करू याविषयी स्लाईड शोच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण केले आणि उपस्थित शंकांचे निरसनही केले.
यावेळी खजिनदार जितेंद्र राठोड,संचालक राजेश राठोड, सुनील मंत्री, महेश जोके, अशोक झाड,सतीश भोजे, राजू चोपडे, संजय पाटील, सुहास जाधव, कुमार दळवी, प्रिया जाधव, मदन कवडे,तुषार साळगावकर आदी उपस्थित होते. प्रफुल्ल खेडकर यांनी आभार मानले. दरम्यान, येत्या 15 दिवसांत कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने 10 लाखांचा धनादेश शासकीय तंत्रनिकेतनकडे सुपूर्द करू, असे आश्वासन भरत ओसवाल यांनी दिले. याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने याचे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात उदघाटनाचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले
Leave a Reply