
मुंबई:मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीच्या वर्षभराच्या कामगिरीची दखल घेत त्यातील उत्कृष्ट कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या आणि प्रेक्षकांसहित अवघ्या मनोरंजनसृष्टीचं लक्ष वेधून घेणाऱ्या झी गौरव पुरस्कार सोहळ्याचा नामांकन सोहळा नुकताच राजेशाही थाटात पार पडला. यावर्षी आपल्या कामगिरीने राज्यातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सैराट चित्रपटाने सर्वाधिक अकरा नामांकने मिळवली आहेत. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या ‘कासव’ ने आठ आणि ‘हाफ तिकीट’ आणि ‘रंगा पतगा’ने सात विभागात नामांकने मिळवत स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे. व्यावसायिक नाटकांमध्ये ‘अमर फोटो स्टुडिओ’ने बाराविभांगात नामांकने मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे तर ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकाने नऊ विभांगात तथा‘कोडमंत्र’ आणि ‘तीन पायांची शर्यत’ नाटकाने प्रत्येकी सहा विभांगात नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत निर्माण केली आहे. प्रायोगिक नाटकांमध्ये ‘हे राम’ दहा नामांकने, ‘एम एच १२ जे १६’ आणि ‘हंडाभर चांदण्या’ नाटकाने प्रत्येकी सात नामांकने मिळवली आहेत.
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत अतिशय मानाचा समजल्या जाणाऱ्या झी गौरव पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता सर्वांनाच असते. या पुरस्कारांत कोण किती नामांकने मिळवतो ? आणि त्यात कोण बाजी मारतो?याबाबत प्रेक्षक आणि मनोरंजनसृष्टीही उत्सुक असते. दरवर्षी एखादी विशिष्ट संकल्पना घेऊन झी गौरव पुरस्कार नामांकन सोहळा आणि पुरस्कार सोहळाही थाटामाटात रंगतो. मराठी मनोरंजनाचं साम्राज्य अशी यावर्षीची संकल्पना असलेल्या झी गौरव पुरस्काराचा नामांकन सोहळाही राजेशाही थाटात पार पडला. मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलावंत देखण्या राजेशाही अंदाजात या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. या सर्व कलाकारांच्या मांदियाळीत नामांकने घोषीत करण्यात आली.
Leave a Reply