
कोल्हापूर : देशाच्या सर्वांगिण विकासासाठी रोखरहित व्यवहार स्वीकारणे अनिवार्य असून सर्वानीच रोखरहित व्यवहार करण्यात सक्रिय सहभागी होवून राष्ट्र उभारणीच्या कार्याला हातभार लावावा, असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
कॅशलेस व्यवहाराबाबत जागरुकता व डिजीटल पध्दतीने आर्थिक व्यवहार करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या डिजीधन मेळाव्याचे उदघाटन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, निती आयोगाचे संचालक अनिलकुमार शर्मा, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक एम.जी.मुज्जाहीन, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचे व्हाईस प्रेसिडेंट महेंद्र जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रोखरहित व्यवहारातून भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी कारभार करुन देशाला एक सक्षम राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी आजपासूनच रोखरहित व्यवहार ही पध्दती अवलंबावी, असे आवाहन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. ते म्हणाले, केंद्र शासनाने नोटा बंदीच्या निर्णयानंतर रोखरहित व्यवहारास प्राधान्य दिले असून त्यादृष्टीने सुविधाही उपलब्ध करुन दिल्या आहेत. देशातील जनतेला रोखरहित पध्दतीची माहिती व्हावी यासाठी केंद्र शासनाने देशातील 100 जिल्ह्यांची डिजीधन मेळाव्यासाठी निवड केली आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून डिजीटल पेमेंट सिस्टिम लोकांना समजून सांगितली जात आहे. या मेळाव्यांचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जगात माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे सर्व व्यवहार होत असून आज आयटी क्षेत्रामुळे ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना प्रत्येक्षात आली आहे. या बदलत्या परिस्थितीत जगाच्या बरोबरीने चालण्यासाठी भारतालाही बदलावे लागत आहे. त्यामुळेच कॅशलेस व्यवहार सर्व पातळीवर होणे गरजेचे बनले आहे. देशात आज 80 टक्के व्यवहार हे कॅश पध्दतीने होत आहेत, त्यामुळे भ्रष्टाचाराला आणि काळ्याबाजाराला मोठा वाव मिळतो हे सर्व टाळून पारदर्शी प्रशासन आणि काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोटा बंदीनंतर स्वीकारलेल्या कॅशलेस पध्दतीचा सर्वानिच अवलंब करावा, असे आवाहनही संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
Leave a Reply