
मुंबई“महाराष्ट्रातील जनता कोणत्याही संकटाचा सामना खंबिरपणे करते. येथील प्रत्येक गावात आणि गावकऱ्यांत कठीण परिस्थितीशी लढण्याची ताकद आहे आणि यामुळेच दुष्काळाच्या संकटावरसुद्धा हे गावकरी एकत्र येऊन मात करतील” असा विश्वास हिंदी चित्रपटसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या सुपरस्टार आमिर खानने व्यक्त केला. निमित्त होतं झी मराठीवरील‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचं. महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती बघता भविष्यात उद्भवणा-या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमिर खान आपल्या ‘पानी फाउंडेशन’ या संस्थेद्वारे छोट्या छोट्या गावांमध्ये काम करतो आहे. गेल्यावर्षी तीन तालुक्यांमधील गावांमध्ये त्याने ‘वॉटर कप स्पर्धेचं’ आयोजन केलं होतं. या स्पर्धेला गावांगावांमधून मिळालेला उत्तम प्रतिसाद बघता यावर्षी‘पानी फाउंडेशन’ तीस तालुक्यांमधील हजारो गावांमध्ये जाऊन तेथील गावक-यांना प्रशिक्षण देणार आहे. याच प्रकल्पाविषयीची माहिती देण्यासाठी आमिर खान आपली पत्नी किरण रावसह या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्याच्यासोबत ‘पानी फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ आणि ज्येष्ठ पाणीतज्ञ तथा प्रकल्प संचालक डॉ. अविनाश पोळ हे देखील उपस्थित होते. येत्या २७ आणि २८ मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे दोन्ही भाग झी मराठीवरुन रात्री ९.३० वा. प्रसारित होणार आहेत.
एक संवेदनशील अभिनेता आणि एक जागरुक नागरिक ही आमिर खानची ओळख सर्वश्रुत आहेच परंतु याही पुढे जाऊन केवळ चर्चा न करता थेट कार्य करण्यात आमिर विश्वास ठेवतो. यामुळेच महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा किंवा काही भाष्य करुन तेवढ्यावरच न थांबता आमिर खानने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. येथील पाण्याच्या समस्येवर सखोल संशोधन करुन ती दूर करण्यासाठी एक प्रभावी, सहज अंमलात आणता येईल अशी योजना आखली आणि त्याची माहिती देण्यासाठी काही तालुक्यांची निवड केली. त्या गावांमध्ये जाऊन आमिरने आणि त्याच्या सहका-यांनी गावक-यांना याबद्दलची माहिती दिली आणि हा प्रकल्प जोमाने सुरु झाला. या सगळ्या प्रकल्पाची ही माहिती आमिर अतिशय उत्साहाने‘चला हवा येऊ द्या’मध्ये सांगत होता आणि सर्व जण भारावून जाऊन ती ऐकतही होते.
Leave a Reply