
मुंबई:
स्टार प्रवाहची ‘नकुशी तरी हवीहवीशी‘ ही मालिका तिच्या आपलेपणामुळे प्रेक्षकांना हवीहवीशी वाटू लागली आहे.
अंधश्रद्धेमुळे ‘नकुशी’ नाव ठेवलेल्या मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या अनवट वळणांचा प्रवास, तिचं भावविश्व आजवर टेलिव्हिजनवर सादर झालेल्या नायिकांपेक्षा वेगळे ठरले आहे. आयुष्यात कितीही संकटे आली तरी स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे स्वत: शोधत मार्ग काढणाऱ्या या नकुशीच्या आयुष्यात एक नवे हळूवार वळण निर्माण झाले आहे.
ऑफिसच्या कामानिमित्त नकुशीचा नवरा रणजीत शिंदेला मनालीला जायची संधी मिळाली आणि ते सुद्धा बायकोला बरोबर घेऊन. नात्यातले तणाव निवळल्याने रणजीत आणि नकुशीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण झाले आहेत,त्यात ही संधी आल्याने बऱ्याच काळापासून एकत्र फिरायला जाण्याचे आणि पर्यायाने हनिमूनचे स्वप्न पूर्ण होते आहे.मध्यमवर्गीय मराठी घरात हनिमून म्हटलं कि जी ठिकाणे चर्चेत असतात,त्यात शिमला, कुलू मनाली आणि फार फार तर ऊटी कोडाईकनाल यांचा क्रमांक वरचा लागतो. ज्या गोष्टीचा विचार रणजीत नुसता करत होता आता ती संधी प्रत्यक्ष त्याला मिळाली आहे.
नकुशीला घेऊन रणजीत मनालीला गेला आणि त्यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळालं. सोलंग व्हॅली, पंडोह ब्रिज, नगर कॅसल, हिडिंबा मंदिर, ग्लेशीयर रेस्टोरंट, माल रोड, ब्यास नदी या ठिकाणी फिरून दोघांनी अप्रतिम वेळ एकमेकांबरोबर घालवला. आयुष्यात कधीही खेळले नसते असे साहसी खेळ ते दोघे तिथे खेळले. पॅराग्लाईडिंग, रिव्हर राफ्टिंग, रिव्हर क्रॉसिंग करत पारंपरिक नाटी नृत्यात सुद्धा ते दोघं सहभागी झाले.हिमाचलच्या निसर्गरम्य वातावरणात हरवून जात, उत्तुंग गिरीशिखरे, बर्फाच्छादित परिसर, निसर्गाची मुक्त हस्ताने केलेली उधळण पाहात, एकत्र वेळ घालवताना ते एकमेकांच्या जास्त जवळ आले. पण नवरा बायको म्हणून ते जवळ येतील का? नकुशीचा भूतकाळ इथे तरी तिचा पाठलाग करणं सोडेल का? या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रवाहवर हा नकुशीचा मनालीतला प्रवास रंगणार आहे.
उपेंद्र लिमये आणि प्रसिद्धी आयलवार या रणजीत – नकुशीच्या लोकप्रिय भूमिकेतल्या कलाकारांचा हा अनोखा अंदाज हिंदीतले प्रख्यात कॅमेरामन बाळू दहिफळे यांनी दृष्ट लागावा असा चित्रित केला आहे. मालिकेत सिनेमॅटीक फिल देणारा हा स्टार प्रवाहच्या नकुशीचा वेगळा प्रयोग सध्या त्याच्या सुरेख चित्रीकरणामुळे चर्चेत आला आहे आणि प्रेक्षकांसाठी तो वेगळा अनुभव ठरणार आहे.
Leave a Reply