
कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना दीर्घकालीन उपाययोजनेद्वारे सक्षम आणि दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात शासनाने भरीव पावले उचलली असल्याचे मत शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख व अर्थतज्ञ प्रा. डॉ. विजय ककडे यांनी व्यक्त केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर आणि जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाहु स्मारक भवन येथे ‘अर्थसंकल्प राज्याचा, संकल्प विकासाचा’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. विजय ककडे बोलत होते. या चर्चासत्राला भारती विद्यापीठाच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्युटचे संचालक डॉ. नितिन नायक, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी, ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रुझ यांनी सहभागी होऊन अर्थसंकल्पावर सविस्तर विश्लेषण केले.
अर्थतज्ञ डॉ. विजय ककडे यांनी शेतीसमोरील संकटे आणि शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या यावर दीर्घकालीन उपाययोजना यंदाच्या अर्थसंकल्पात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र उद्योग व्यापार क्षेत्रालाही झुकते माप द्यायला हवे होते, अशी अपेक्षाही व्यक्त केली. राज्यावर असलेले कर्जाचे ओझे आणि व्याजाचा मोठा बोजा यामुळे विकास कामासाठी पैसा कमी उपलब्ध होत आहे. यावर उपाय म्हणून कर्ज कमी करण्यासाठी विशेष तरतूद करुन महसूली तुट शुन्यावर येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यंदाच्या अर्थसंकल्पात प्लॅन आणि नॉनप्लॅन खर्च एकत्र केल्याने निधीचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होणार आहे आणि ही या अर्थसंकल्पातील चांगली बाब आहे. शेती, दुष्काळ, पायाभूत सुविधा या सारख्या प्रश्नांवर सर्जिकल स्ट्राईक करणारा हा अर्थसंकल्प आहे. कोल्हापूरसाठी पर्यटन, रस्ते, औद्योगिक प्रशिक्षण या गोष्टीवर अधिक तरतूद होऊन राष्ट्रीय मानव निर्देशांक वाढविण्याची गरजही त्यांची यावेळी व्यक्त केली.
Leave a Reply