मुंबई – राज्यात निवासी डॉक्टरांनी गेल्या ३ दिवसांपासून संप चालू केला आहे. २२ मार्चला निवासी डॉक्टरांच्या मागण्यांविषयी सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून आज रात्री ८ वाजल्यापासून निवासी डॉक्टर कामावर उपस्थित रहाण्याविषयी त्यांनी आश्वासन दिले आहे. निवासी डॉक्टरांनी केलेल्या मागणीनुसार राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात जवळजवळ १ सहस्र १०० सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. यासाठी २३ कोटी रुपयांचा व्यय वर्षाला येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी २२ मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गिरीश महाजन म्हणाले, ‘‘निवासी डॉक्टरांशी २ घंटे चर्चा झाली. त्यांच्या मागण्यांविषयी शासन गांभिर्याने विचार करेल. येत्या १५ दिवसांत टप्प्याटप्यांनी रुग्णालयात २० ते २५ वयोगटातील सुरक्षारक्षकांची भरती करण्यात येईल. रुग्णालयात दिवसा येणार्या रुग्णांच्या नातेवाईकांची संख्या अधिक असल्याने त्यांच्याशी संवाद साधतांना वादावादीचे प्रकार घडतात. यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना ओळखपत्र (पास) देण्यात येतील. तसेच रुग्णालयात अलाराम, सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. निवासी डॉक्टरांसाठी सामूहिक विमा काढणार आहोत. रुग्णांच्या नातेवाईकांशी निवासी डॉक्टरांनी नम्रपणे बोलले पाहिजे. नातेवाईकांशी त्यांनी योग्य समन्वय ठेवला पाहिजे. हे होत नसल्याने नातेवाईकांची सहनशीलता संपून ते डॉक्टरांवर आक्रमण करतात, असे लक्षात आले आहे.’’
Leave a Reply