303 फुट उंच राष्ट्रध्वज राष्ट्रभक्तीचे ऊर्जा स्त्रोत; पोलिसांच्या पाठीशी जनतेने सदैव रहावे:मुख्यमंत्री

 

कोल्हापूर : महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्वात उंच आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच राष्ट्रध्वज भेट दिल्याबद्दल कोल्हापूरकरांचे अभिनंदन करुन पोलीस उद्यान कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारे असून या ठिकाणी आल्यानंतर देशभक्तीची भावना जागृत होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या थोर परंपरेची जाणिव होते. क्रांतीकारकांच्या बलिदानाची जाणिव होते. 303 फुट उंचीच्या राष्ट्रध्वजाकडे पाहिल्यावर गौरव आणि अभिमान वाटतो. हे उद्यान आणि हा राष्ट्रध्वज देशभरातील आणि जगभरातील पर्यटकांमध्ये राष्ट्रभक्तीची ऊर्जा निर्माण करणारा ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत कोल्हापूर पोलीस उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या 303 फुट उंचीच्या ध्वजस्तंभाचे अनावरण आणि नुतनीकरण करण्यात आलेल्या पोलीस उद्यानाचा लोकार्पण सोहळा यामध्ये मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, अभिनेते अक्षयकुमार, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार सर्वश्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, चंद्रदिप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील, अमल महाडिक, श्रीमती संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आबिटकर, सत्यजीत पाटील, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक महादेव तांबडे आदिजण उपस्थित हेाते.

देशभरातील आणि जगभरातील अंबाबाईच्या दर्शनाला येणारे भाविक या पोलीस उद्यानाला आणि 303 फुट उंचीच्या राष्ट्रध्वजाला भेट देतील आणि येथून राष्ट्रभक्तीची ऊर्जा घेतील असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस दलातील सहायक उपनिरीक्षक यांच्यापेक्षा खालील श्रेणीतील सेवानिवृत्त पोलीसांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरु करण्यात येणार असून सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय यांना विविध प्रकारच्या 1200 आजारांवर मोफत उपचार मिळतील, अशी योजना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जे पोलीस चोवीस तास समाजासाठी कार्यरत असतात आपल्या जीवनातील अनेक मोलाचे क्षण समाजासाठी देतात, अनंत अडचणींचा धैर्याने, शौर्याने सामना करतात त्यांच्या पाठीशी आपण सर्वानी उभे राहिले पाहिजे, असे सांगून महाराष्ट्राचे पोलीस दल देशात उत्तम कामगिरी करत असल्याने अपराध सिध्दीचा दर 58 टक्यापर्यंत गेला आहे, त्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहिलेच पाहिजे. कोल्हापूर येथील पोलीसांच्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचे कामही सुरु करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अभिनेते अक्षयकुमार यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अक्षयकुमार हे अत्यंत संवेदनशिल अभिनेते आहेत. महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी जलयुक्त शिवार अभियानासाठी 50 लाखाचा धनादेश दिला. भारत के वीर या त्यांच्या संकल्पनेमागची प्रेरणाही त्यांनी यावेळी सांगितली. सिमेवर लढणाऱ्या सैनिक, पोलीस यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी देश बाधवांना उभे करण्यासाठी त्यांनी भारत के वीर हे ॲप सुरु करुन सैनिकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी निधी संकलनात पुढाकार घेतला आहे. ते केवळ रिल लाईफचेच नव्हे तर रियल लाईफचेही सुपरस्टार आहेत. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि विश्वास नांगरे पाटील यांचे त्यांनी या उपक्रमांबद्दल अभिनंदन केले.
अभिनेते अक्षयकुमार यांनी मी पहिलांद्याच कोल्हापूरला आलोय असे अस्खलीत मराठी बोलून छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय अशी घोषणा करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी त्यांनी मी पंजाबचा असून महाराष्ट्र दिनी मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसण्याचा मान मिळाला ही खुप अभिमानाची बाब आहे, असे सांगितले. हेलिकॉप्टरमधून येताना 303 फुट उंच राष्ट्रध्वज बघून आपण कोल्हापुरात आलो आहोत याची जाणिव झाल्याचे सांगून हे पोलीस उद्यान पर्यटन स्थळ बनेल असे सांगितले. यावेळी त्यांनी भारत के वीर या ॲपबाबतची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कोल्हापूरनगरीच्यावतीने अक्षयकुमार यांचा सन्मान करण्यात आला. भारत के वीर या अभियानासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 1 लाखाचा निधी अक्षयकुमार यांच्याकडे सुपूर्द केला. राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी कोल्हापूर जिल्हा आणि शहराच्या पर्यटन वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून शाहू महाराजांनी पर्यटन दृष्ट्या विकसित केलेल्या स्थळानंतर जिल्ह्यात पर्यटन दृष्ट्या नवे काही निर्माण झाले नाही. कोल्हापूरच्या पर्यटनाच्या दृष्टीने नवीन स्थळे विकसित करण्यात येत आहेत. यामध्ये रया केलेल्या पोलीस उद्यानाचे नुतनीकरण करण्यात येवून या ठिकाणी राज्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभा केला. कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला आलेला पर्यटक कोल्हापुरात रहावा यासाठी पर्यटन वाढीला चालना देण्यात येत आहे. येत्या काळात 8 हजार फुलपाखरांचे उद्यान उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी आजच्या महाराष्ट्र दिनी कोल्हापुरात सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारला ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून पोलीसांसाठी आरोग्य, घरे यांचे विषय मार्गी लागत आहेत. पोलीसांवरील मानसिक ताण कमी करण्यासाठी योगाचे प्रशिक्षण देण्यात येत असून पोलीसांच्या हुशार पाल्यांसाठी 25 हजार रुपये पर्यंतची स्कॉलरशिप योजना सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस दलाच्या मनुष्यबळातही येत्या काळात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले. यामध्ये त्यांनी 1 लाख स्क्वेअर फुटाचे पोलीस उद्यान आणि 303 फुट उंचीच्या ध्वजस्तंभावर फडकणारा राष्ट्रध्वज हा कोल्हापूरचा मानबिंदू असल्याचे सांगून मुख्यमंत्री पोलीस दलाच्या विषयांबाबत अत्यंत संवेदनशिल असून 5306 घरांचा टप्पा त्यांनी मंजूर केला आहे. 1369 घरांची टेंडर प्रक्रिया सुरु असून 1 वर्षात ही घरे पूर्ण होतील, असे सांगितले. महाराष्ट्राचे पोलीस शिवबाचे मावळे असून सर्व सामान्यांच्या रक्षणासाठी ते सैदव दक्ष राहतील, अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमामध्ये केएसबीपीचे सुजय पित्रे यांचा गत तीन महिने अहोरात्र कष्ट करुन पोलीस उद्यानाचे सुशोभिकरण व 303 फुट उंचीचा ध्वजस्तंभ उभारल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाध्ये ए.एस.पी. फार्मासिटीकल, पुणे विश्वेश्वरीया बँक, पुणे जनता बँक, चाटे शिक्षण समुह, उद्यागपती संजय घोडावत यांच्यातर्फे पोलीस कल्याण निधीला मदत दिली. सुत्रसंचालन चारुदत्त जोशी यांनी केले तर आभार जिल्हा पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!