
कोल्हापूर : देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या आणि महाराष्ट्रातील सर्वात ऊंच अशा 303 फूट उंचीच्या ध्वजस्तंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसिध्द सिनेअभिनेता अक्षयकुमार यांच्या उपस्थितीत पोलीस बँड व राष्ट्रगीत गावून तसेच आकाशात तिरंगा रंगाचे फुगे सोडून या ध्वजस्तंभाचे लोकार्पण करण्यात आले. आजपासून हा ध्वजस्तंभ जनतेसाठी खुला झाला आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पा अंतर्गत उभारलेल्या ध्वजस्तंभाची माहिती दिली. 303 फुट उंचीच्या या राष्ट्रध्वजस्तंभावर डौलाने फडकणाऱ्या या राष्ट्रध्वजावरही आकाशातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
कोल्हापूरच्या इतिहासात 303 फुट उंचीचा हा ध्वजस्तंभ पहिल्यांदाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने उभारला असून या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज डौलाने आसंमतात फडकू लागला आहे. हा क्षण डोळयात टिपण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, प्रसिध्द सिनेअभिनेता अक्षयकुमार यांच्यासह सर्वजण माना उंच करुन आकाशात डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाकडे अभिमानाने पाहात होते.
कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कोल्हापूर पोलीस उद्यानामध्ये 303 फूट उंचीच्या ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून हा ध्वजस्तंभ देशातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि राज्यातील सर्वात ऊंच असा 303 फूट उंचीचा आहे. या ध्वजस्तंभावर 90 फुट लांब व 60 फुट रुंद अशा 5 हजार 400 चौरस फुटाचा राष्ट्रध्वज दिमाखाने फडकू लागला आहे. हा राष्ट्रध्वज प्रत्येकालाच देशाभिमान आणि देशप्रेमाची प्रेरणा देत आहे. कोल्हापूर शहराच्या सर्व बाजूंनी हा राष्ट्रध्वज सहज दिसत आहे.
कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कोल्हापूर पोलीस उद्यान विकसित करण्यात आले असून या उद्यानात 1857 ते 1947 या काळातील भारताच्या स्वातंत्र्यलढयाची चित्रमय मांडणी केली असून त्याची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याबरोबरच बलीदान, शांतता आणि समृध्दी याचं प्रतिक असणाऱ्या केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगातून भित्तीचित्र साकारण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून देशासाठी बलीदान केलेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमा केशरी रंगामध्ये रेखाटल्या आहेत, तर पांढऱ्या रंगामध्ये महात्मा गांधी आणि गौतम बुध्द यांच्या शांतीचा संदेश देणाऱ्या प्रतिमा आहेत. तसेच हिरव्या रंगामध्ये समृध्दीने नटलेला भारत रेखाटला आहे. आय लव्ह कोल्हापूर या अक्षरांमधून कोल्हापूरची सर्व वैशिष्टे दर्शविणाऱ्या सेल्फी पॉईंटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर आणि प्रसिध्द सिनेअभिनेता अक्षयकुमार यांनी सेल्फी काढली. तसेच उद्यानात विविध राष्ट्रपुरुषांच्या विनायल प्रिंटींग करुन प्रदर्शीत करण्यात आलेल्या प्रतिमांची पाहणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
याप्रंसगी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, शाहू महाराज छत्रपती, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदिप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, पोलीस महासंचालक सतीश माथुर, शिवाजी विद्यापीठचे कुलगुरु देवानंद शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, नवनियुक्त पोलीस अधिक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, माजी खासदार निवेदीता माने, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, केएसबीपीचे सुजय पित्रे यांच्यासह आदि मान्यवर आणि कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply