
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे निसर्गोपचार, सूत्रसंचालन, रोपवाटिका (नर्सरी) आणि प्राथमिक योग या चार अभ्यासक्रमांचे वर्ग येत्या १५ मे पासून सुरू करण्यात येत आहेत. इच्छुकांनी या विभागाशी ०२३१-२६०९१५० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९०११००१५१४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विभागाच्या प्रभारी संचालक डॉ. सुमन बुवा यांनी केले आहे.
निसर्गोपचाराविषयी माहिती देताना डॉ. बुवा म्हणाल्या, आजच्या स्पर्धात्मक काळात प्रत्येकाला करावी लागणारी धावपळ आणि ताणतणाव यातून मुक्तीसाठी सहज सुलभ व विनाऔषधी उपचार पद्धतींची आवश्यकता आहे. निसर्गोपचार उपचार पद्धती आबालवृद्धांना स्वास्थ्यरक्षणार्थ उपयुक्त आहे. योगोपचार, आसने, मुद्रा, प्राणायम व ध्यान-धारणा व समाधी तसेच निसर्गोपचारात उपवास, मसाज, सनबाथ, ॲक्युप्रेशर, मड-थेरपी, आहार, जलोपचार हे अत्यंत सोपे व सार्वत्रिक स्वरूपाचे उपचार असून आरोग्य रक्षणार्थ, व्याधी निर्मूलनासाठी प्रभावीपणे काम करतात. महात्मा गांधी यांनी विश्वकल्याण व मानवतेसाठी निसर्गपचाराचा प्रचार-प्रसार व उत्तम उपचार करून घेतला. शरीर, मन, आत्मा, व निसर्ग यांच्या सुसंवादासाठी आज सर्वांना योग – निसर्गोपचार अभ्यासक्रमाची अंत्यत आवश्यकता आहे.
निसर्गोपचार व योग प्रचार व प्रसार करणे, निसर्गोपचार शास्त्राच्या विविध उपचार पद्धतीच्या उपाययोजनांचे ज्ञान करून देणे, आसन-प्राणायाम, ध्यान-धारणा व मुद्रा याद्वारे निरामय जीवन प्राप्त करून करणे, थोर योग निसर्गोपचारकांचा परिचय करून देणे, शरीरशास्त्राचा प्रारंभिक परिचय करूण देणे, शारिरिक व मानसिक स्वास्थ्य, संपादन करण्यास मदत करणे, लंघन व निर्दोष आहाराद्वारे शरीरशुध्दी करणे ही या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
सुत्रसंचालन अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थी तसेच हौशी व्यक्तींसाठी आकाशवाणी, दूरदर्शन, ध्वनीचित्रफीत, वाद्यवृंद, वृत्तपत्र, डबिंग, जाहिरात अशा अनेक क्षेत्रांमध्ये सूत्रसंचालन करण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
रोपवाटीका(नर्सरी) अभ्यासक्रमांतर्गत रोपवाटीका (नर्सरी) व बागकामाचे कौशल्य साध्य करून घेण्याचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात येणार आहे. याचा लाभ गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ व त्वरित काम मिळविण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.
प्राथमिक योग (योग शिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम) हा अभ्यासक्रम योग शिक्षकांची गरज पूर्ण करू शकणारा आहे. सध्या योगासन व प्राणायामला अतिशय महत्व आले आहे. निरोगी आरोग्यासाठी व उत्साहवर्धक निरामय जीवनासाठी योगासनाला मोठे महत्त्व आहे. त्या दृष्टीने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
या सर्व अभ्यासक्रमांना विभागातर्फे जॉब प्लेसमेंटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी, १५ मे पासून सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमांसाठी इच्छुकांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहनही डॉ. बुवा यांनी केले आहे.
Leave a Reply