
कोल्हापूर: राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. येत्या 22 मे पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूरपासून मुंबईला चालत जाऊन राज्यपालांना आपल्या मागण्या मांडणार आहेत. देशात व राज्यातही सरकारसोबत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासह इतर नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री फडणवीस हे तर पोपटपंची आहेत, अशी टीका संघटनेचे अमर कदम यांनी केले तर चंद्रकांतदादा अखंड जिल्हा तुमचा नाही हे लक्षात ठेवा असा इशारा अजित पोवार यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गुरुवारी शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर झालेल्या सभेत सर्वच वक्त्यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार म्हणाले, “पालकमंत्री पाटील हे जिल्हा आपला आहे म्हणतात. ते थोरले भाऊ आहेत म्हणून असे म्हणत असतील पण वाटण्या करताना थोडा जादा वाटा त्यांनी घ्यावा पण अखंड कोल्हापूर त्यांचे नाही हे लक्षात ठेवावे. शेतकऱ्यांची ही फौज निर्णय घ्यायला लावणारी आहे हेही लक्षात ठेवा.’असेही ते म्हणाले.
Leave a Reply