
कोल्हापूर: हज यात्रेकरूंच्या मनोभावे सेवेचा वसा घेवून स्थापन करण्यात आलेल्या हज फौंडेशन,कोल्हापूर या ट्रस्टचा उद्घाटन समारंभ व बोधचिन्हाचे अनावरण रविवारी २१ मे २०१७ रोजी शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ ते २ या वेळेत राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष जमितुल उलेमा,अहमदनगरचे अध्यक्ष मौलाना काझी मुफ्ती इर्शादुल्लाह मखदुमी कास्मी हे आहेत.तसेच कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास,खासदार धनंजय महाडिक,जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या सन्माननीय उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हाजी सिकंदर मणेर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या २५ वर्षापासून हाजी सिकंदर मणेर आपल्या सहकाऱ्यांसमवेत हज यात्रेसाठी जाणाऱ्या हाजी लोकांना त्यांच्या हजयात्रे दरम्यानचे मक्का आणि मदिना या दोन्ही शहरातील हजचे सर्व पवित्र विधी,विमानाचा जाण्यासह-परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी यात्रेच्या आधी १० दिवासांचे अत्याधुनिक तंत्रशुद्ध प्रशिक्षण आयोजित करतात.त्यांच्या या मानसेवी कार्याला असेच यापुढेही सुरु ठेवत,हज यात्रेहून परतलेल्या हाजी बांधवांना आपल्या उर्वरित आयुष्यात कोणत्याही गरजेच्या शासकीय कामकाजात तसेच आरोग्याच्या समस्या,कौटुंबिक समस्या,आर्थिक अडचणी अशा कोणत्याही त्रासाला सामोरे जावू लागू नये यासाठी त्यांची मनोभावे सेवा करण्याच्या उद्देशाने हज फौंडेशन,कोल्हापूर या बहुउद्देशीय ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे.या ट्रस्टचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून सुरवातीला कोल्हापूर जिल्ह्यातून या ट्रस्टचे कामकाज सुरु केले जाणार आहे असे त्यांनी सांगितले.
मुस्लीम धर्मियांसाठी अतिशय महत्वाचे तत्व मानल्या गेलेल्या हज यात्रेसाठी दरवर्षी भारतातून सौदी अरेबिया स्थित मक्का आणि मदिना या शहरात जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या जवळपास ७० हजारावर आहे.महाराष्ट्रातून मुस्लीम लोकसंख्येच्या आधारावर जवळपास ९ ते १० हजार हज यात्रेकरू या यात्रेसाठी रवाना होतात.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून किमान २०० ते २५० हज यात्रेकरू दरवर्षी या यात्रेत सहभागी होतात.कोल्हापूर जिल्ह्यातून यावर्षी २४० हज यात्रेकरू हज यात्रेला जाणार आहेत.सौदी अरेबिया मध्ये अतिउच्च तापमान असल्याने उन्हाच्या झळांनी हाजी लोक हैराण होतात,त्यांना उन्हापासून त्रास होवू नये यासाठी हज फौंडेशनच्या वतीने भेट म्हणून हज यात्रेतील लाखो लोकांमधून कोल्हापूरचे यात्रेकरू सहज ओळखता येतील यासाठी विशेष चिन्हांच्या छपाई केलेल्या छत्र्यांचे वाटप सुद्धा या कार्यक्रमात केले जाणार आहे.
गोरगरीब,विधवा,तलाकशुधा मुस्लीम महिलांना लघुउद्योग सुरु करून देवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.त्याच प्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी योग्य ती मदत,सर्व धर्मियांसाठी आरोग्य विषयक शिबिरे आयोजन आणि त्यानंतर लागणाऱ्या उपचारांसाठी आवश्यक ती मदत देण्याचे कार्य हज फौंडेशन,कोल्हापूर या ट्रस्ट मार्फत केले जाणार आहे. ट्रस्टच्या उद्दिष्टांपैकी महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे हज यात्रेला जावून आलेल्या सर्व हाजी यात्रेकरूंना या ट्रस्टचे आजीवन सभासदत्व दिले जाणार आहे. अशी माहिती ट्रस्टचे सचिव समीर मुजावर यांनी दिली.
या कार्यक्रमात जमितुल उलेमा,अहमदनगरचे अध्यक्ष मौलाना काझी मुफ्ती इर्शादुल्लाह मखदुमी कास्मी हे मार्गदर्शन करणार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेहून परतलेल्या आणि यंदा जाणाऱ्या हाजी यात्रेकरुनी तसेच हज यात्रेची माहिती जाणून घेवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला ट्रस्टचे उपाध्यक्ष हाजी बालेचांद म्हालदार,खजानिस निवृत्त पोलीस अधिकारी हाजी बाबासाहेब शेख,तसेच कार्यकारणी सदस्य हाजी अस्लम मोमीन,हाजी इम्तियाज बारगीर,इम्तिहाज बागवान,सादतखान पठाण,समीर पटवेगार,यासीन उस्ताद उपस्थित होते.
Leave a Reply