
कोल्हापूर : पत्रकारांच्या निरंतर प्रशिक्षणासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रशिक्षण संस्था उभारण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य राहिल. त्यातून आजच्या गळेकापू स्पर्धेत महाराष्ट्रातील पत्रकार ठामपणे उभे राहू शकतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी केले.
यदु जोशी हे शासकीय कामानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आले असून या दौऱ्यात त्यानी कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकारांची भेट घेवून त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत ते बोलत होते. त्यांच्या समवेत माहिती उपसंचालक सतीश लळीत, विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य विश्वास पाटील, विजय कुंभार, पुढारीचे अनिल देशमुख, सकाळचे निखिल पंडीतराव, पुण्यनगरीचे सुखदेव गिरी, झी 24 तासचे प्रताप नाईक, लोकमतचे समीर देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या जीवनातील अनेक वर्षे ज्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देवून या क्षेत्राला दिशा देण्याचा, नवे आयाम देण्याचा प्रयत्न केला अशा ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानपूर्वक त्यांच्याकडे जाऊन अधिस्वीकृती पत्रिका देण्याचा निर्णय यदु जोशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला आहे. त्यानुसार आज श्री. जोशी यांनी पुढारीचे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना सन्मानपूर्वक महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृतीपत्रिका दिली. यावेळी पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांची उपस्थिती होती. ज्येष्ठ पत्रकार विलासराव झुंझार, दशरथ पारेकर आणि डॉ. सुभाष देसाई यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रविण टोकेकर, उदय तानपाठक उपस्थित होते.
त्यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान यदु जोशी म्हणाले, आज अनेक क्षेत्रात त्या त्या क्षेत्रामध्ये कार्यरत मनुष्यबळाचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी अनेक प्रशिक्षण केंद्रे आहेत. पण अशा प्रशिक्षण केंद्रांची पत्रकारितेच्या क्षेत्रात फार मोठी गरजही आहे आणि उणीवही आहे. त्यामुळे पत्रकारांच्या निरंतर प्रशिक्षणासाठी कायमस्वरुपी प्रशिक्षण संस्था उभारण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती देऊन पत्रकारांनी आपल्या सूचना समितीला कळवाव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Leave a Reply