
चेन्नई: देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेत अत्यंत प्रभावीपणे काम करून,नाविन्यपूर्ण उपक्रम, योजना राबवणार्या तसेच स्वत:च्या मतदार संघासह संपूर्ण कोल्हापुर जिल्ह्याच्या विकासासाठी झटणा-या खासदार धनंजय महाडिक यांना आज संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार आनंदराव आडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या शासकीय समितीने खासदार महाडिक यांची संसद रत्न पुरस्कारासाठी निवड केली. देशपातळीवरील अत्यंत मानाच्या अशा या पुरस्काराचा वितरण सोहळा, आज चेन्नई इथं आय आय टी मद्रास च्या सभागृहात पार पडला. संसदेमध्ये सर्वाधिक प्रश्न अभ्यासूपणे उपस्थित करणारे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना सन्मानपत्र देऊन, संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासदार पदाची सुत्रं स्विकारल्यापासून मतदार संघासह जिल्हयाच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घेतले. त्याचें चिज झाल्याची प्रतिक्रिया खासदार महाडिक यांनी व्यक्त केली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आणि कोल्हापूरच्या जनतेने दिलेले पाठबळ,यामुळे आपण ही कामगिरी करू शकलो, असे सांगून खासदार महाडिक यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशपातळीवरील हा मानाचा पुरस्कार आपण कोल्हापूरच्या जनतेला अर्पण करत असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
Leave a Reply