
कोल्हापूर
– शेतकऱ्यांच्या कष्टाला, त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रगत तंत्रज्ञान, चांगले बी बियाणे, खतांबरोबरच शेतकऱ्याला इतर जोडधंदेही उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी शासन प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांच्या जीवनात आंनद निर्माण व्हावा, शेतकऱ्यांचे हित जोपासले जावे म्हणून गोकूळ बरोबरच राज्यातील इतर सहकारी संस्थांना शासन सर्वतोपरी सहकार्य करून प्रोत्साहित करत आहे. राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापूर एम. आय. डी. सी. शिरगाव कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. गोकुळचे शिल्पकार व माजी चेअरमन स्व. श्री. आनंदराव पाटील-चुयेकर यांचा पुतळा अनावरण समारंभ व श्री. महालक्ष्मी पशुधन कारखाना वास्तूउद्घाटन सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार व भोगावती सहकार साखर कारखान्याचे संचालक पी. एन. पाटील, एन. डी.डी.बी. आणंदचे कार्यकारी संचालक संग्रामसिंह चौधरी, माजी आ. बजरंगराव पाटील, माजी आ. भरमू देसाई, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, कार्यकारी संचाकल दत्तात्रय घाणेकर, श्रीमती. जयश्री पाटील-चुयेकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एम. आय. डी. सि. शिरगाव येथील गोकुळ दुध संघ इमारतीच्या प्रांगणात श्री. आनंदराव पाटील-चुयेकर यांचा पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर श्री. महालक्ष्मी पशुधन कारखाना वस्तूच्या कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले.
राज्यात 01 कोटी 37 लाख खातेदार शेतकरी आहेत. त्यातील 80 टक्के अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत शासन लवकरच निर्णय घेणार असून उर्वरित 20 टक्के मोठ्या शेतकऱ्यांच्याबाबतही लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल. मात्र राज्यात सुरू असलेला शेतकरी संप अल्प काळातच संपल्यामुळे अनेकांची पंचायत झाली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण केले जात आहे. खरेतर गेल्या पंधरा वर्षात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले नाहीत, तेच निर्णय गेल्या एक दोन वर्षात या शासनाने घेतलेले आहेत. ड्रीप ऑटोमाईल ऑन सोलर सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती क्षेत्रात क्रांती घडविण्याचा शासनाचा मानस आहे. सर्वानी एकत्रित येवून हां विकास साधला पाहिजे. आनंदराव पाटील-चुयेकर यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी सामन्यातील सामान्य शेतकऱ्याचा विकास साधला गेला पाहिजे यासाठी एक दृष्टिकोन ठेवून कार्य केले. त्याची फलश्रुती म्हणून आज गोकुळसारखी दुध उत्पादक संस्था नावारूपाला आली आहे. श्री. महालक्ष्मी पशुधन सारखा कारखाना हे त्याचेच उदाहरण आहे. त्यांनी दाखवलेल्या दिशेने आपण वाटचाल करणे आवश्यक असून, गोकूळने शेतकरी, दुध उत्पादकांच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवावेत राज्य शासन शेतकऱ्यांचे हीत जोपासणाऱ्या गोकुळ संस्थेच्या नेहमीच पाठीशी राहील. अशी ग्वाही ही यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यंनी दिली.
Leave a Reply