
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात गेल्या १ जूनपासून सुरू असलेल्या ‘आव्हान-२०१७’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराच्या समारोप समारंभाच्या पूर्वसंध्येला शिबिरार्थींनी कोल्हापूर शहरातून मोठ्या जल्लोषात रॅली काढून नागरिकांत आपत्ती व्यवस्थापनापासून ते लेक वाचवा अभियानापर्यंत विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली. पावसाचा शिडकावा सुरू असतानाही स्वयंसेवकांचा उत्साह कमी झाला नाही, हे विशेष!
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, डॉ. वासंती रासम, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एस.डी. इंगळे यांच्यासह एनडीआरएफचे जवान, एनएसएसचे जिल्हा संपर्क अधिकारी, विद्यापीठाचे शिक्षक, अधिकारी, सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘आव्हान-२०१७’मध्ये राज्यभरातील चौदा विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे १२०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. दि. १ जूनपासून गेल्या नऊ दिवसांत भूमी, जल आदी ठिकाणी उद्भवणाऱ्या विविध आपत्ती आणि त्यांचे व्यवस्थापन, मदतकार्य, पुनर्वसन आदींविषयी एनडीआरएफच्या जवानांच्या सहकार्याने अत्यंत उत्तम प्रशिक्षण या स्वयंसेवकांना देण्यात आले आहे. या कालावधीतील संपूर्ण प्रशिक्षणावर आधारित लेखी, प्रात्यक्षिक व मौखिक परीक्षाही आज सकाळी घेण्यात आली. त्यानंतर आज सायंकाळी आपत्ती व्यवस्थासह विविध सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात जगजागृतीपर रॅली शहरातून काढण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून प्रारंभ झाल्यानंतर मालती अपार्टमेंट, आईचा पुतळा व सायबरमार्गे ही रॅली पुन्हा विद्यापीठात प्रविष्ट होऊन तिची सांगता करण्यात आली.
Leave a Reply