
कोल्हापूर – ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन उभे करण्याच्या उद्देशाने १४ जूनपासून गोवा येथे सहावे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ प्रारंभ होत आहे. १७ जूनपर्यंत चालणार्या या अधिवेशनाला भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील १५० हून अधिक हिंदु संघटनांचे ४०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित रहातील. यात कोल्हापूर जिल्ह्यातून येथून २ जण सहभागी होणार आहेत. या सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सामायिक कृती आराखड्यांतर्गत वर्षभरातील उपक्रम आणि आंदोलनांची दिशा निश्चित करणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे किरण दुसे आणि सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार घोरपडे, शहराध्यक्ष मनोहर सोरप, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहरप्रमुख शरद माळी उपस्थित होते.
किरण दुसे पुढे म्हणाले की, हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेत असला, तरी हिंदूंच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्या बंदी, राममंदिराचे पुनर्निर्माण आदी विषयांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. जवानांवरील दगडफेक, त्यांच्या हत्या आजही रोखता आलेल्या नाहीत किंवा जवानांवरील दगडफेक हा राजद्रोह ठरवला जात नाही. त्यामुळे हिंदु संघटनांनी आता पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून निर्धार करण्यात येणार आहे. मागील ५ राष्ट्रीय अधिवेशनांत निश्चित झाल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात श्री महालक्ष्मी मंदिरातील काशी कुंडाची स्वच्छता करून ते भाविकांसाठी खुले करावे, पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन देवस्थान समितीने सामाजिक कार्यासाठी २ कोटी रुपयांचा मंजूर केलेला निधी रहित करण्यात यावा, शिवाजी विद्यापिठाला छत्रपती शिवाजी विद्यापीठ नामकरण करण्यात यावे आदी विषयांवर आंदोलने करण्यात आली, तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कर्नाटकातील बेळगाव असे ४ जिल्ह्यांचे मिळून १२ फेब्रुवारी २०१७ जया दिवशी कोल्हापूर येथे स्थानिक संघटनांचे संघटन करण्यासाठी प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या सहाव्या अधिवेशनाद्वारे होईल. या अधिवेशनात येथून हिंदुत्वनिष्ठ उद्योजक आनंद पाटील आणि सुधाकर सुतार हे मान्यवर सहभागी होतील.
Leave a Reply