
कोल्हापूर : प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्यातून प्रयाग चिखली येथील दत्त मंदिरासह परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. शहरालगत असणारे प्रयाग चिखली येथील दत्त मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या काही वर्षात हे मंदिर विकासापासून वंचित राहिल्याने कोल्हापूर जिल्ह्यासह परगावाहून येणाऱ्या भक्तगणांची गैरसोय होत होती. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिवेशन काळामध्ये या मंदिराचे सुशोभिकरण व्हावे यासाठी पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावळ यांना निवेदन सादर केले होते. त्यानुसार यासंदर्भातील प्रस्ताव देण्याचे आदेश जिल्हा नियोजन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागास दिला आहे. याकरिता पर्यटन खात्याकडून रु. पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याने येणाऱ्या काळात मंदिर आणि परिसराचा कायापालट होऊन, भाविकांना मुलभूत सोईसुविधा प्राप्त होणार आहेत.
मंदिर विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामस्थ यांची मते जाणून घेत मंदिरास भेट दिली. यासह आराखड्यामध्ये आवश्यक असलेल्या बाबींचा समावेश सर्वच घटकांना विचारात घेऊन करण्याच्या सुचना दिल्या.
कोल्हापूर शहरास दक्षिण कशी म्हणून संबोधले जाते. १४ व्या शतकातील स्थापत्य शास्त्रातील उत्कृष्ट नमुना असलेले श्री अंबाबाई मंदिर, यासह एतिहासिक पन्हाळा गड, श्री श्रेत्र जोतीबा, शहरातील नवदुर्गा मंदिरे, नृसिंहवाडी, खिद्रापूर, बाहुबली, श्री क्षेत्र आदमापूर, पावनखिंड आदी धार्मिक, ऐतिहासिक स्थळांमुळे अधात्य्म, ऐतिहासिक असा मिलाफ असलेले शहर म्हणून कोल्हापूरचे महत्व पर्यटनाच्या दृष्टीने अधिकच वाढले आहे. कोल्हापूर मध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्याही दिवसगणिक वाढत आहे.
कोल्हापूर शहरालागतच पंचगंगा नदी काठावर प्रयाग चिखली हे श्री दत्त देवस्थान आहे. कोल्हापूर जिल्ह्यास वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीचे हे उगमस्थान आहे. प्रत्येक वर्षीच्या माघ महिन्यासह कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याकरिता कोल्हापूरसह मुंबई, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोकण परिसरातून लाखो भाविक या ठिकाणी येतात. प्रयागच्या संगमावरती असणार्या घाटावर माघ महिन्यात स्नान करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी होते. भाविकांची वर्दळ लक्षात घेता या मंदिरासह परिसराचा विकास होऊन भाविकांना मुलभूत सोईसुविधा मिळणे गरजेचे आहे. याबाबत पर्यटन खात्याकडून या मंदिरासह परिसरास निधी मिळावा अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली होती. याअनुषंगाने या ठिकाणी भाविकांसाठी सोयीसुविधा पुरविण्याच्या उद्देशाने पर्यटन विकास आराखड्यातून येथील विकासकामे करण्यात येणार आहेत.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अधिकाऱ्यांनी मंदिरास दिलेल्या भेटी दरम्यान या परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी मूळ मंदिर, नदी घाट, परिसरातील समाधी, छोटी मंदिरे यांची सखोल पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी, मंदिराचे सुशोभिकरण, दर्शन मंडप, बाहेर गावाहून येणार्या भक्तांच्या सोयीसाठी भक्त निवास, नदी घाटाजवळ स्त्री- पुरुष स्वतंत्र स्नानगृह, स्वच्छतागृह, परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, विद्युत व्यवस्था आदींचा समावेश आराखड्यामध्ये करण्याच्या सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यासह सार्वजनिक बांधकाम विभागाने उपअभियंता दीपक हरणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.उगिले, श्री.पाटील, ग्रामस्थ माजी सरपंच केवलसिंग रजपूत, अशोक पाटील, कुमार दळवी आदी उपस्थित होते.
Leave a Reply