
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील गोगवे येथील शहीद जवान सावन माने यांच्या घरी भेट देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात महाराष्ट्र शासन सहभागी असून शासन पूर्णपणे त्यांच्या कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने शहीद जवान सावन माने यांच्या कुटुंबियांना 8 लाखाची मदत प्राधान्याने दिली जाईल, याबरोबरच केंद्र सरकारची 10 लाखाची मदत मिळेल. त्यासाठीचे प्रस्ताव पन्हाळा प्रांताधिकारी अजय पवार यांनी तात्काळ तयार करावेत, असे निर्देश दिले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारची सैनिकांसाठी असणाऱ्या विमा योजनेचेही 24 लाख रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.
जम्मू काश्मीर भागातील पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्या सोबत लढताना शहीद झालेल्या जवान सावन बाळकू माने यांच्या घरी भेट देवून वडील बाळकू माने, भाऊ सागर माने यांच्यासह कुटुंबियांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांत्वन केले.
यावेळी त्यांनी गावातील लोकांनी मागणी केल्यानुसार गोगवे येथील गायरान जमिनीवर शासकीय क्रिडा संकुल उभे करण्यात येईल व त्यास शहीद सावन माने असे नाव देण्यात येईल. त्यासाठीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ तयार करावा, असेही सांगितले. शहीद सावन माने यांचे वडील सैन्यात सेवा बजावून निवृत्त झाले आहेत. त्यांचा भाऊ सागर माने हेही सैन्यात सेवा बजावत आहेत. संपूर्ण कुटुंब देश रक्षणार्थ सेवा बजावणारे आहे पण या कुटुंबाकडे जमिन नाही. निवृत्त सैनिकांना शासकीय जमिन देण्याबाबतच्या कायद्यात बदल झाला आहे पण कायद्याच्या चौकटीत राहून जमिन कशी त्यांना उपलब्ध करुन देता येईल याबाबत अभ्यास करण्याचे निर्देशही त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत पन्हाळा उपविभागीय अधिकारी अजय पवार, शाहूवाडीचे पोलीस उप अधीक्षक आर.आर.पाटील यांची उपस्थिती होती.
Leave a Reply