
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी आपल्या जीवनात सामान्य माणसासाठी अभुतपूर्व काम केले असून शाहूंचे हे कार्य आणि विकास विषयक विचार नव्या पिढीस अनुकरणीय आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे केले.
राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना येथील शाहू स्मारक भवनमध्ये आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर हसिना फरास, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, सौ. वैशाली माशेलकर, ट्रस्टचे सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे आदि मान्यवर उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण आणि भविष्य ओळखून 21 सप्टेंबर 1917 रोजी सक्तीच्या शिक्षणाचा हुकूमनामा जारी केला. हा हुकूमनामा शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक असल्याचे स्पष्ट करुन पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, शाहूंच्या या हुकूनाम्याला 21 सप्टेंरला 100 वर्ष पूर्ण होत असून हा दिवस सर्वांनी साजरा करणे आवश्यक आहे. शाहूंचे कार्य आणि विचारांचा वारसा जोपासणे आवश्यक असून त्यांचे विचार 21 व्या शतकातही मोलाचे आणि प्रेरणादायी असून शाहूंच्या कारर्कीदीवर आधारीत ‘अखंड प्रेरणा शाहू विचाराची’ हे पुस्तक लिहिले जावे, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक आणि सामाजिक विकासाचे बहुमोल काम केले असल्याचे सांगून पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, शाहू महाराजांनी शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग यांचा समन्वय साधून कारभार केला. शिक्षण सक्तीचे करुन शिक्षणाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली. योग्य शिक्षण हे महत्वाचे असून आजच्या शिक्षण पध्दतीत बदल होणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. समता, न्याय, कला, क्रिडा, आरक्षण, शिक्षण, शेती, सहकार, जलसिंचन अशा विविध क्षेत्रात राजर्षी शाहूंनी राबविलेली धोरणे आजही उपयुक्त आणि मार्गदर्शक असल्याचेही ते म्हणाले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे देशात कोल्हापूरची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्याकाळी शाहूंनी राबविलेले कार्य व धोरण जगाच्या पुढेच असून कोल्हापूरही जगाच्या पुढे आहे, हा संदेश नव्या पिढीला देणे गरजेचे आहे. ध्येयवादी, समता प्रेमी, सामान्यांचा कैवारी अशा द्रष्ट्या लोकराजा शाहू महाराजांच्या नावाने मिळालेला पुरस्कार आपल्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार असल्याचेही पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
Leave a Reply