
पंढरपूर : राज्यातील शेतकरी कर्जमुक्त होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सपत्नीक श्री विठ्ठल आणि रूक्मीणी यांची शासकीय महापूजा केली. त्यानंतर विठ्ठल मंदीराच्या सभागृहात मानाचे वारकरी दांपत्य परसराम उत्तमराव मेरत आणि सौ. अनुसया परसराम मेरत यांचा सत्कार करण्यात आला. श्री. मेरत (वय 54 वर्षे) आणि सौ. मेरत (वय 45 वर्षे) रा. बाळसमुद्र ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मानाचे वारकरी म्हणून शासकीय महापूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील वर्षी मी, श्री विठ्ठलाच्या चरणी भरभरून पाऊस पाडण्याचे साकडे घातले होते. गेल्यावर्षी श्री विठ्ठलाच्या कृपेने राज्यभरात भरभरून पाऊस पडला. शेतकऱ्यांचे उत्पादनही भरभरून आले. राज्य शासनाने नुकताच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला सहाय्य देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्त करण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाला बळ द्यावे, अशी मागणी विठ्ठल चरणी केली.
विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतील काही सदस्यपदे रिक्त आहेत. या पदावरील नियुक्ती करताना वारकरी संघटनांशी चर्चा करूनच केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी परसराम मेरत यांचा तर सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते सौ. अनुसया मेरत यांचा सत्कार करण्यात आला. पंधरा हजार रूपयाचा धनादेश, वर्षभर प्रवासासाठी एसटीचा पास त्यांना प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला तर सौ. दिपाली भोसले यांनी सौ. अमृता फडणवीस यांचा सत्कार केला. मंदीर समितीचे नूतन अध्यक्ष अतुल भोसले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राज्यमंत्री दीपक केसरकर, नगराध्यक्षा साधना भोसले, आमदार महेश लांडगे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
Leave a Reply