शहरात हेल्मेट सक्ती ऐवजी वाहतूक यंत्रणा सुधारण्यावर भर द्यावा :आ.राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात १५ जुलै पासुन हेल्मेट सक्ती करणार असल्याचे पोलीस प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. पण, खरंच याची गरज आहे का? आमचा हेल्मेटला विरोध नाही,, पण हेलमेट सक्ती करण्याच्या विरोधात कोल्हापूरमध्ये यापुर्वीहि आंदोलन झाले आहेत. शहरात हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर पोलीस प्रशासनाने भर देणे गरजेचे आहे. अशा हेल्मेट सक्तीच्या आदेशामुळे साहजिकच दुचाकी चालकास वेठीस धरले जाणार असून, शहरात हेल्मेट सक्ती न करता वाहन चालकांचे प्रबोधन करावे, असे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. हेल्मेट सक्ती संदर्भात आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना शहर कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, कोल्हापूर शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता कोल्हापूर शहराची सीमा मर्यादित आहेत. शहराचे क्षेत्रफळ इतर शहरांच्या मानाने मर्यादित आहे. त्यातच कोल्हापूर शहरामध्ये राहणारे नागरिक हे बहुतांश सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यामुळे शहरात दुचाकी वाहनधारकांची संख्या अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे दुचाकीवाला माणूस हा कायदा राबवायला, पोलिसांसाठी सॉफ्ट टार्गेट असतो, हे चित्र शहरातील कोणत्याही चौकात आपण पाहू शकतो. महिला, महाविद्यालयीन मुले, छोटे व्यावसायिक आणि नोकरदार मंडळी डोक्याला त्रास नको व वेळ नाही म्हणुन निमुटपणे दंड भरतात. त्यामुळे अशा हेल्मेट सक्तीच्या आदेशामुळे दुचाकी चालकांना वेठीस धरण्यास अधिकच वाव मिळणार आहे.
कोल्हापूर शहराची सध्याची स्थिती पहिली तर वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. अरुंद रस्ते, अवास्तव पार्किंग, अवजड वाहनांचा शहरात प्रवेश आदीमुळे वाहतुकीची समस्या अधिकच गंभीर बनल्याचे दिसून येत आहे. ही वाहतुकीची होणारी कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोल्हापूर शहरात अपघातास शहरातील खड्डे पडलेले रस्ते कारणीभूत आहेत. कोल्हापुर शहरात सध्या दुचाकी चालवताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. याकडे डोळेझाक करून हेल्मेट सक्ती करणे कितपत योग्य आहे.
त्यामुळे पोलीस प्रशासनाने हेल्मेट सक्ती ऐवजी कोल्हापूर शहरात रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी पार्किंग होणाऱ्या चारचाकी गाड्यांमुळे होणारी गर्दी कमी करावी. अवजड वाहनांना शहरातून दिवसा प्रवेश देण्याएवजी शहरालगत असणाऱ्या रिंग रोड वरून त्यांना वाहतुकीची सक्ती करावी, शहरातील ट्राफिक सिग्नल सुधारावेत, शहरामध्ये दिशादर्शक, मार्गदर्शक फलक लावावेत, वाहन चालकांवर हेल्मेट सक्ती करण्याऐवजी त्यांचे प्रबोधन करावे, जेणेकरून सर्वसामान्य दुचाकी चालक वेठीस धरला जाणार नाही. यासह वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन, येणाऱ्या काळात शहरात वाहतुकीची कोंडी होणार नाही, या करिता प्रशासनाने अधिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!