
कोल्हापूर : पेट्रोल पंपावर विक्रीच्या परिमाणामध्ये फेरबदल करण्यात येत असल्याच्या घटना अलिकडे उघडकीस आल्या आहेत त्यामुळे पेट्रोल पंप तपासणीचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांनी अचानकपणे तपासणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी दिली. तसेच पेट्रोल पंपाच्या ठिकाणी दर्शनी भागात दरबदल फलक लावणे बंधनकारक असून ज्या ठिकाणी असे फलक लावले जाणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगून यासाठी पेट्रोल कंपन्यांनी सातत्याने आढावा घ्यावा. आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध न करुन देणाऱ्या पेट्रोल चालकांवर दंडात्मक कारवाई करावी. अशा सूचनाही आगवणे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत दिल्या.
विद्यार्थी वाहतुक अवैधपणे करणाऱ्या वाहनांवर कारवाई व्हावी अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेच्यावतीने या बैठकीत करण्यात आल्या. यावर सदरचा विषय हा सामाजिक असून तो सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, पालक आणि शाळा व्यवस्थापन यांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापनांना तसेच वाहनधारकांना याबाबतच्या नियमांची जाणीव करुन द्यावी असेही श्री. आगवणे यांनी यावेळी सूचित केले. विजेचे खांब ज्या ठिकाणी सुस्थितीत नाहीत अशा ठिकाणी यंत्रणेने आपत्तीचे दिवस असल्याने जीवीत व वित्तीय हानी होऊ नये यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
या बैठकीत शाळांमध्ये होणाऱ्या स्टेशनरी विक्रीबाबत प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच फॅन्सी नंबर फ्लेट लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीस पोलीस उप अधिक्षक राजेंद्र शेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता गीता काळे, एस टी महामंडळाचे वाहतुक निरीक्षक एस.जी.चिखलव्हाळे, औषध निरीक्षक एस. के.महिंद्रकर, ग्राहक संरक्षण परिषदेचे संजय हुक्केरी, बी.जे.पाटील, रेखा हांजे, विजय पाटील, ए.ने. चवंड्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Leave a Reply