रेशनिंगमध्ये बायोमॅट्रीक राज्यात कोल्हापूर आघाडीवर:जिल्हा पुरवठा अधिकारी

 

कोल्हापूर : जिल्ह्यात रेशनिंग प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि गुणात्मकता यावी यासाठी पुरवठा विभागाने रेशनिंग दुकानामध्ये बायोमॅट्रीक प्रणाली राबविली असून कोल्हापूर राज्यात अग्रेसर आहे. यापुढील काळात रेशनिंगमधील धान्य वितरणातही कॅशलेस प्रणाली राबविण्याचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी आज येथे बोलताना केले.
येथील करवीर तालुक्यातील शिये येथील चौकार मित्र मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या गणेशोत्सवात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संवादपर्व कार्यक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे बोलत होते. संवादपर्व कार्यक्रमास माहिती अधिकारी एस. आर. माने, माजी सरपंच विश्वास पाटील, मंडळाचे अध्यक्ष विनायक पाटील, राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप बुवा यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. पाहुण्यांनी श्रींचे दर्शन घेतले .
रेशनिंगमध्ये बायोमॅट्रीक प्रणाली वापरुन कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात लौकिक प्राप्त केला आहे असे सांगून जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे म्हणाले, जिल्ह्यात पुरवठा विभागाने ई-रेशनिंगचा स्वतंत्र पॅटर्न राबविला आहे. गेल्या चार महिन्यात अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सुमारे साडेचार लाखाहून अधिक कुटुंबांना एक कोटीहून अधिक धान्य वाटप केले आहे. कोल्हापूरच्या पुरवठा विभागाचे ई-रेशनिंग प्रणाली खऱ्या अर्थाने यशस्वी झाली असून पात्र लाभार्थीलाच धान्य वितरण झाल्याने या प्रणालीत अधिक पारदर्शकता निर्माण झाली आहे. बायोमॅट्रीक प्रणालीमध्ये संगकणकीकृत यंत्रणेद्वारे ग्राहकांची तसेच धान्य उचलल्याचे माहिती अपडेट होत आहे. शिवाय थमइंप्रेशन शिवाय लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही. त्यामुळे पात्र व गरजू कुटुंबाला स्वस्त धान्याचा पुरवठा होत आहे.
स्वस्त धान्य दुकानांना मिनी बँक म्हणून काम करणार असल्याने यापुढील काळात रास्त भाव दुकानांनी अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करुन लाभार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे म्हणाले, आगामी काळात सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने रेशनिंग प्रणालीमध्येही ऑनलाईन व्यवहार होतील. त्यामुळे भविष्यातील कॅशलेस प्रणालीसाठी रेशनिंग दुकानदारांनीही सज्ज रहावे, असे अवाहनही त्यांनी केले.
संपूर्ण कोल्हापूर शहर केरोसिन मुक्त झाले असून जिल्ह्यातही सुमारे 65 टक्के केरोसिन बंद झाले आहे. नजिकच्या काळात संपूर्ण जिल्हा केरोसिन मुक्त करण्याचा पुरवठा विभागाचा संकल्प असल्याचे सांगून जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे म्हणाले, घराघरात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस पुरवठा उपलब्ध होत असल्याने केरोसिनची आवश्यकता भासत नाही. जिल्ह्यात केलेल्या केरोसिन मुक्तीमुळे महिन्याला सुमारे तीन ते साडेतीन कोटीची शासनाची बचत झाली असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!