
कोल्हापूर: शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होवू नये यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. गतवेळी दिलेल्या कर्जमाफीत राहिलेल्या त्रुटी लक्षात घेवून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली आहे. सरसकट दीड लाखापर्यंतचे कृषी कर्जमाफ करुन शेतकऱ्याला सन्मानित करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण व सत्कार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात झाला. लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र व साडी-चोळी आणि पेहराव देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा उप निबंधक (सहकारी संस्था) अरुण काकडे, विभागीय सह निबंधक (सहकारी संस्था) तुषार काकडे, पणनचे विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब यादव, जिल्हा विशेष लेखा परीक्षक डी.बी.बोराडे-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
28 जून 2017 रोजी शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय देण्याची भुमिका मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याने घेतली, असे सांगून उपेक्षित समाजाला न्याय देण्याची भुमिका घेणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या भुमित शेतकऱ्याला सन्मानित करण्याची संधी आपल्याला मिळाल्याची भावना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.
शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होवू नये यासाठी शासन विविध योजना राबवित असून जलयुक्त शिवार अभियान, शेत मालाला आधारभुत किमत, थेट भाजीपाला विक्री, सोयाबीन-तुर खरेदी, ऊसाची एफआरपी वाढ आदिंच्या माध्यमातून शेतकरी सुखी-समृध्द करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात आहेत, असे सांगून सदाभाऊ खोत म्हणाले, ऑनलाईन अर्ज व त्यांची छाननी, याद्या तयार करणे, योजनेच्या अंमलबजावणीची व्यापक प्रसिध्दी करणे यासाठी जिल्हास्तरावर व उपविभागीय स्तरावर समिती स्थापन करण्यात येत असून नियमित कर्जदारांच्या खात्यावरही लवकरच प्रोत्साहन रक्कम जमा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेत कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 2,70,590 अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील 53,262 थकबाकीदार असून 223 कोटी 17 लाख रुपये थकबाकीची रक्कम आहे. तर राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण बँकांमधील 54,729 थकबाकीदार असून 65 कोटी 13 लाख थकबाकीची रक्कम आहे. जिल्ह्यातील एकूण पात्र 1847 विकास कार्यकारी सहकारी संस्थामधील 2,52,970 सभासदांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, दिवाळीच्या पहिल्या दिवशी शेतकरी कर्जमाफी योजना प्रत्यक्ष अंमलात आणण्याचा हा क्षण ऐतिहासिक क्षण असून जिल्ह्यातील 391 ग्रामपंचायतींचे चावडी वाचन झाले असून उर्वरित ग्रामपंचायतींचे चावडी वाचन 25 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रत्येक तालुक्यातील 2 अशा 24 लाभार्थी शेतकरी दांपत्यांचा प्रमाणपत्र, साडी-चोळी व पेहराव देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात शेतकऱ्यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले तर आभार जिल्हा उप निबंधक (सहकारी संस्था) अरुण काकडे यांनी मानले. यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाने कर्जमाफी देवून दिवाळी गोड केल्याची भावना व्यक्त केली.
0 0 0 0 0 0 0
Leave a Reply