कोल्हापूर: विमानतळाला कार्यान्वित परवाना मिळण्यासंदर्भात आणि विमान सेवा सुरू होण्यासंदर्भात एअरपोर्ट ऍथॉरिटी आणि डीजीसीए यांची समिती आज कोल्हापुरात आली. आज दिवसभरात अधिकार्यांनी यासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी केली. गुरूवारी समिती सदस्य विमानतळाला भेट देणार आहेत. दरम्यान समिती सदस्यांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन चर्चा केली. चार दिवसांत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला ही समिती अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर १५ दिवसांत प्री ऑपरेटिंग परवाना कोल्हापूर विमानतळासाठी मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कोल्हापूर विमानतळाचा उड्डाण परवाना २०११ सालापासून रद्द झालाय. कोल्हापूरची नागरी विमानसेवा सुरू होण्यामध्ये ही एक मोठी अडचण आहे. यासंदर्भात खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्यानं पाठपुरावा केलाय. संसदेतही याबद्दल आवाज उठवला. नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी संसदेत ऑक्टोबर मध्ये कोल्हापूरची हवाई सेवा सुरू होईल, असं आश्वासन दिलं होतं. प्रत्यक्षात डे ऑपरेटिंग परवाना नसल्यानं ही सेवा सुरू झालेली नाही. खासदार महाडिक यांनी, या प्रकरणी नामदार राजू यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिला होता. तसंच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सर्व संबंधीत घटकांची मुंबईत बैठक घेवून, परवाना मिळवण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानंतर नागरी हवाई वाहतुक विभागानं तातडीनं हालचाली सुरू केल्या. एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया आणि नागरी हवाई वाहतुक संचालनालय यांची समिती आजपासून कोल्हापूरच्या दौर्यावर आलीय. त्यामध्ये संचालनालयाच्या श्रीमती सुवित्रा सक्सेना आणि प्राधिकरणाचे एस. बालन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे. दिवसभरात या कमिटीनं विमानतळ संदर्भातील विविध कागदपत्रांची तपासणी केली. गुरूवारी संपूर्ण विमानतळ आणि परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील चार दिवसांत त्याबद्दलचा अहवाल, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला दिला जाईल. या कमिटीनं आज सायंकाळी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेवून विमानतळ सुरु करण्यासंदर्भात चर्चा केली. पाहणी केल्यानंतरचा अहवाल सादर झाल्यानंतर १५ दिवसात कोल्हापूर विमान तळाला परवाना मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसंच ज्यावेळी पहिलं विमान कोल्हापूर विमान तळावर उतरेल, त्यावेळी कायमस्वरुपी विमान उड्डाण परवाना देणार असल्याची ग्वाही, आज या समितीनं खासदार महाडिक यांना दिली. दरम्यान यापूर्वी आपण पाठपुरावा करून मंजुर करून घेतलेल्या २७४ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. सध्या या कामासाठी सल्लागार, अभियंते नेमण्यात आले आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण डीपीआर बनवून टेंडर काढणार असल्याचं अधिकार्यांनी सांगितलं. त्यामध्ये एक किलोमीटर लांबीचा रन वे, टर्मिनल बिल्डिंग, ईटीसी टॉवर आणि फायर फायटिंग इक्विपमेंट ही कामं होणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं. खासदार महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळं येत्या १५ दिवसांत कोल्हापूर विमानतळाला उड्डाण परवाना प्राप्त होईल आणि लवकरच विमानसेवा सुरू होईल, अशी आशा आहे. या बैठकीवेळी कृष्णाकुमार, दीपक खोब्रागडे, मानसिंग माने, पूजा मूल, राजेश अय्यर, मुकेश वर्मा यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.
Leave a Reply