
कोल्हापूर :विद्या प्रबोधिनी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आज यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी विद्या प्रबोधिनीच्या अभिजित तिवले, राहुल रणदिवे व अजित देवकुळे यांची कर सहाय्यकपदी, उत्तम रेडेकर आणि सतिश राऊत यांची महाराष्ट्र पोलीस तर अभिजित नलवडे आणि साहिल मुलाणी यांची अनुक्रमे बँक ऑफ बडोदा आणि मर्चंट नेव्ही मध्ये निवड झाली. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार आज शहर उप-अधिक्षक डॉ.प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते विद्या प्रबोधिनीच्या सभागृहात पार पडला.
विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या आता पर्यंतच्या गौरवपूर्ण कामगिरीची माहिती देताना भविष्यात स्पर्धा परिक्षा क्षेत्रात विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.अचूक ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कितीही मोठे ध्येय तुम्ही सहज साध्य करू शकता तसेच सोशल मिडीयाचा मर्यादित वापर, ध्येय व चिकाटी अशा गोष्टी आचरणात आणून ध्येय पूर्ती करा असे मनोगत शहर उप-अधिक्षक डॉ.प्रशांत अमृतकर यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील काही अनुभव सांगीतले त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. यश मिळविण्यासाठी अभ्यासातील सातत्य, चांगले संदर्भ तसेच गट चर्चा यांना त्यांनी महत्व दिले. तसेच निवड झाल्यानंतर पोलीस प्रशासनामध्ये आलेले अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पुरुषांप्रमाणेच महिला हि पोलीस प्रशासनात उत्तम कामगिरी करू शकतात हे त्यांनी आवर्जून नमूद केले.यावेळी विद्या प्रबोधिनीने उपलब्ध करून दिलेल्या विविध सोयी-सुविधांचे त्यांनी कौतुक केले.एका दुर्धर आजारामुळे दोन वर्षे अंथरुणाला खिळून असलेल्या अमृतकर यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा परिक्षेत राज्यात दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होत पोलीस उपअधिक्षक पद मिळवले. त्यांचा हा प्रवास जितका खडतर होता तितकाच तो प्रेरणादायी होता. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रवीण गांगुर्डे, वृंदा सलगर, नितीन कामत यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ सार्या कुलकर्णी यांनी तर आभार एमपीएससी विभाग प्रमुख अमित लव्हटे यांनी मानले.
Leave a Reply