
कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये बेरोजगार महिलांसाठी व अपंगासाठी ई-रिक्षा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणीव ठेवून शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीने हा प्रकल्प सुरु करणेत येणार आहे. या ई-रिक्षासाठी लागणारे मार्जिन मनी अंदाजे दहा टक्के आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन च्या वतीने आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातून भरगोस प्रतिसाद मिळाला असून, यामध्ये महिला व अपंग व्यक्तींनी सुमारे दीडशे पेक्षा अधिक अर्ज केले आहेत. ई रिक्षाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण आणि गरजू महिला, अपंग व्यक्ती यांच्या स्वावलांबनास व रोजगार निर्मितीस चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने महिला व अपंग व्यक्तींसाठी देण्यात येणाऱ्या ई- रिक्षाचे प्रात्यक्षिक आणि लाभार्थ्यांचे ट्रेनिंग आजपासून दुधाळी मैदान, उत्तरेश्वर पेठ येथे आयोजित करण्यात आले आहे याप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर बोलत होते.कार्यक्रमाची सुरवात ई रिक्षाच्या पूजनाने आणि श्रीफळ वाढवून करण्यात आली. या नंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी महिला व अपंग व्यक्तींना प्रोत्साहन देण्याकरिता स्वत: ई रिक्षा चालवीत शहरातून दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ परिसराचा फेरफटका मारला.यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी,शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी, पेट्रोल-डिझेलचा वापर टाळण्यासाठी आणि शहरवासियांना सुरक्षित प्रवास मिळवून देण्यासाठी वीजेवर चालणाऱ्या ई-रिक्षा आताकोल्हापूर शहरात सुरुवात होणार आहेत. कोल्हापूर शहर सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रदूषण हे रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होत असल्याने ई-रिक्षा येणाऱ्या काळामध्ये प्रदूषण रोखण्यास मदत करणार आहेत. ई-रिक्षा यंत्रणेच्या प्रणालीची अमंलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागानेही परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात शहरातील ई-रिक्षा रस्त्यावरसुसाटपणे धावणार आहेत. या ई-रिक्षाना देशभरातील काही मोठ्या शहरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूर शहरात ही संकल्पना राबवावी पण यातून गरजू महिला व अपंग व्यक्तींना रोजगार निर्मिती व्हावी, हा या उपक्रमाचा मूळ हेतू आहे. या रिक्षा साठी लागणारी दहा टक्के मार्जिन मनीची रक्कम आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन उचलणार असल्याचे नमूद करीत, या उपक्रमातून पर्यावरणाचे रक्षण आणि गरजू महिला, अपंग व्यक्ती यांच्या रोजगार निर्मितीस नक्कीच चालना मिळणार असल्याचे नमूद केले.यावेळी संपूर्ण उपक्रमाची माहिती देताना माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी, सध्या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर फौंडेशनच्या वतीने १०० ई – रिक्षा वितरीत करण्याचे नियोजित केले आहे. या रिक्षाची एकूण किंमत रु.१ लाख ६५ हजार इतकी असून, त्यातील ई रिक्षा करिता येणारी आर.टी.ओ फी, लायसन्स फी, इन्शुरन्स आदी १० टक्के रक्कम आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कमचे कर्जप्रकरण लाभार्थ्याला करून देनेत येणार आहे. आगामी दोन दिवसांमध्ये याकरिता अर्ज केलेल्या सर्वांचे ट्रेनिंग होणार असून, दिवसा सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत महिलांचे आणि सायंकाळी ४ ते ६ मध्ये पुरुषांचे ट्रेनिंग होणार आहे. यानंतर आर. टी. ओ. कार्यालयाशी बैठक पार पडून मूळ वाहतूक व्यवस्थेला कोणताही बाधा न पोहचता या ई रिक्षासाठी स्वतंत्र थांबे (स्टॉप) तयार केले जाणार आहेत, यासह शिवसेना ई रिक्षा युनियनची निर्मिती करून या व्यवसायास पाठबळ दिले जाणार आहे, अशी माहिती दिली. यावेळी माजी उपमहापौर उदय पवार, दीपक गौड, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, रमेश खाडे, रघुनाथ टिपुगडे, विभागप्रमुख मंदार तपकिरे, दिनेश साळोखे, गजानन भुर्के, रुपेश रोडे, युवा सेना शहरप्रमुख अविनाश कामते, पियुष चव्हाण, कपिल सरनाईक, सुरज साळोखे, अनिकेत राऊत, अपंग सहाय्य सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल मिरजे, अथर्व यात्री ई रिक्षा कंपनीचे डॉ. वाघ, ट्रेनर गोरक्षनाथ राजगुरू आदी मान्यवर, महिला आणि अपंग व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply