फुलेवाडी जकात नाका ते रंकाळा टॉवर रस्त्यावरील 60 अतिक्रमणे हटविली

 

कोल्हापूर : महापालिकेच्या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयामार्फत आज केलेल्या अतिक्रमण निर्मुलन कारवाईत फुलेवाडी जकात नाका ते रंकाळा टॉवर रस्त्यावर विनापरवाना उभारण्यात आलेल्या केबीन, शेड, हातगाडया, होर्डिग्ज व बॅनर अशी एकूण 60 अतिक्रमणे हटविण्यात आली.
यामध्ये फुलेवाडी फायर स्टेशनलगत एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून विकसित केलेल्या रस्तेवरील, फायर स्टेशन पाठीमागील ओपनस्पेसमधील अतिक्रमीत केबीन, शेड व मंडप अशी 22 अतिक्रमणे हटविली. यावेळी केबीनधारक व महापालिका अधिकारी यांच्यात वादावादी झाली. पोलिसांनी विरोध करणाऱ्या केबीनधारकांना कडक सुचना देवून वाद मिटविला. यानंतर याठिकाणच्या सर्व केबीन शांततेत हटविण्यात आली. याचबरोबर रंकाळा टॉवर ते फुलेवाडी रस्तेवरील विनापरवाना उभारण्यात आलेले होर्डीग्ज, बॅनर काढण्यात आले.  जुना राजवाडा पोलिस स्टेशनकडील पोलिस व अग्निशमन दलाकडील जवान यांचा बंदोबस्त होता.
सदरची कारवाई आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांचे आदेशानुसार व शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांचे नियंत्रणाखाली उपशहर अभियंता एस.के.माने, रमेश मस्कर, आर.के.जाधव, हर्षजित घाटगे, अतिक्रमण प्रमुख पंडीत पोवार, कनिष्ठ अभियंता राजेंद्र वेल्हाळ, अनिरुध्द कोरडे, सर्व्हेअर तानाजी गेंजगे, मुकादम उमेश माने, मिलींद कारेकर यांनी केली. सदर मोहिमेसाठी 90 कर्मचारी, 2 जेसीबी, बुम, कटर ट्रॉली, ट्रॅक्टर, डंपर 3, अग्निशमन गाडी अशी यंत्रणा कार्यरत होती.
महानगरपालिकेच्या कोणत्याही अनुमतीशिवाय शहरातील फुटपाथ, रहदारीचे चौक, मंडई, महानगरपालिकेच्या खुल्या जागा इत्यादी ठिकाणी ज्यांनी अनधिकृतपणे व महानगरपालिकेच्या अनुमती खेरीज कोणत्याही प्रकारची अतिक्रमणे/ अनधिकृत शेड, बांधकाम  केलेली आहेत. तसेच जी अतिक्रमणे रहदारीला अडथळा ठरत आहेत. अशी सर्व अतिक्रमणे स्वत:हून काढून घ्यावीत. अन्यथा अतिक्रमण मोहिमेमध्ये कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान झालेस त्यास महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही याची सर्व संबंधित नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!