
कोल्हापूर :तीन वर्षापासून सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युतीचे सरकार सर्व पातळीवर सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभर बाराही तालुक्यातील तहसील आणि प्रांत कार्यालयावर सोमवारी हल्लाबोल आंदोलन केले.आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन होणार असून दसरा चौकातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केवळ आश्वासने देवून भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली असल्याचे सांगून ए.वाय.पाटील म्हणाले, शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यावसायीक, शिक्षक, डॉक्टर अशा सर्वच क्षेत्रातील लोकांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी आहे. नोटाबंदी आणि जीएसटीच्या आतताई निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असणाऱ्या खासगी विशेष अधिकाऱ्यांनी राज्याचे प्रशासनच ताब्यात घेतले आहे. आवश्यकतेनुसार विशेष प्राधान्य असणाऱ्या गोष्टीना महत्व देण्याऐवजी बुलेट ट्रेन, समृद्धी मार्ग अशा अनावश्यक बाबींवर राज्याची तिजोरी खाली केली जात आहे. त्यामुळेच या अनागोंदी कारभारविरोधात राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन सुरू केले असून उद्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन धडकणार आहे. सोमवारी जिल्हाभर झालेल्या आंदोलनात हजारो सर्वसामान्य लोंकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला आहे. नागपुर अधिवेशनात १२ डीसेंबर शरद पवार यांच्या वाढदिनी या आंदोलनाचा समारोप केला जाणार आहे.
ते म्हणाले, हल्लाबोल आंदोलनाची अनेक कारणे आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न जैसे थे आहेत. सरसकट कर्जमाफी देवून सात बारा कोरा करावा, शेतमालाच्या निर्यातीत ६४ हजार कोटींची घट झाली आहे तर आयात ६५ हजार कोटींची आहे. शेतकऱ्यांविरोधात असल्या व्यापक धोरणामुळे शेतकरी उध्वस्त होत आहे. तातडीने उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा हे धोरण जाहिर करावे, गुजरातच्या धर्तीवर कापसाला हमीभावावर ५०० रूपये बोनस द्यावा. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच अनेक क्षेत्रातील बिघडलेली स्थिती दूरूस्त करून संबधीत घटकांना जगता येईल असे वातावरण तयार करावे. बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था मुळपदावर आणावी, उद्योग रोजगारात झालेली घसरण थांबवावी, अशा मागण्यांबरोबरच नागरी भागातील समस्या, कर्जबाजारी राज्य, विजेच्या समस्या, महागाई, आरोग्याचे प्रश्न, शिष्यवृत्तीचे प्रश्न, आरक्षण, बालमृत्य आणि कुपोषण, ढासळलेली शिक्षण व्यवस्था अशा अनेक समस्या सरकारला सोडवता आलेल्या नाहीत त्या विरोधात हे आंदोलन छेडले आहे. पत्रकार परिषदेला, महापौर हसीना फरास, शहराध्यक्ष राजू लाटकर, राष्ट्रवादी गटनेते, नगरसेवक सुनील पाटील, आर. के. पोवार, संगीता खाडे आदी उपस्थित होते.
Leave a Reply