
कोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी जगात जे जे सुंदर दिसेल, ते ते कोल्हापूरात साकारण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापुरात येत्या 8 ते 13 फेब्रुवारी अशा सहा दिवसांचा कोल्हापूर महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
पोलीस मुख्यालयासमोरील पोलीस उद्यानातील आयोजित केलेल्या कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलचा समारोप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्या प्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार अमल महाडिक, अंजली चंद्रकांत पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाचे प्रमुख सुजय पित्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापुरचे सौंदर्य वाढवून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जगातले नव नवे प्रकल्प कोल्हापुरात साकारण्यासाठी खंबीरपणे उभे राहू, या प्रकल्पांच्या पूर्तीसाठी आवश्यकती सर्व मदत करुन कोल्हापूर जगाच्या नकाशावर पोहचविण्याचा प्रयत्न राहील. कोल्हापुरात रस्ते सौंदर्यीकरण, चौकांचे सुशोभिकरण, नव ऊर्जा उत्सव आणि कोल्हापूर फ्लॉवर फेस्टीवल असे राज्यातील प्रथम उपक्रम राबविले गेले आणि ते कोल्हापूरकरांच्या आणि पर्यटकांच्या उत्स्फुर्त सहभागाने यशस्वी झाले,याचे समाधान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply