शिवाजी विद्यापीठ व सीड इन्फोटेकतर्फे सीड आयटी आयडल’- कोल्हापूर २०१८

 

कोल्हापूर:इंजिनिअरींग, एमसीएम, एमसीएस, एमसीए आणि संगणकाशी संबंधित सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला जाणारा ‘सीड आयटी आयडल’ –  कोल्हापूर २०१८ या बहुप्रतीक्षित उपक्रमाला कोल्हापूरमध्ये सुरुवात झाली आहे. उपक्रमाचे हे यशस्वी ९ वे वर्ष असून या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील संगणकीय कौशल्याची कसोटी घेतली जाते. ‘सीड इन्फोटेक’तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमास शिवाजी विद्यापीठाचेही सहकार्य लाभले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

‘सीड आयटी आयडल’ हा ‘सीड इन्फोटेक’तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येणारा प्रमुख उपक्रम आहे. गेल्या नऊ वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे स्वरूप पाहून राज्यातील बहुतांश विद्यापीठे यामध्ये सहभागी होतात. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा यासाठी विद्यापीठांकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाते.

कोल्हापूरमध्ये ‘सीड आयटी आयडल’ हा उपक्रम शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने राबविला जातो. ‘सी प्रोग्रामिंग’ व ‘कॉम्प्युटर फंडामेंटल्स’ या विषयीचे विद्यार्थ्यांचे ज्ञान जोखून त्यांना पुरस्काराने सन्मानित करणे, तसेच रोजगाराच्या संधींबाबत व आयटी उद्योगात आवश्यक असणाऱ्या कौशल्यांबाबत विद्यार्थ्यांना जागृत करणे आणि भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेसाठी त्यांना सज्ज करणे, असे विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

कोल्हापूरमधील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांची नोंदणी करण्याचे काम सुरू झाले असून दुसरी व अंतिम फेरी तसेच पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन मार्च २०१८ च्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे.

‘सीड आयटी आयडल’च्या रचनेनुसार पहिल्या फेरीत ‘सी प्रोग्रामिंग’ आणि ‘कॉम्प्युटर फंडामेंटल्स’च्या ज्ञानावर आधारित लेखी परीक्षा घेतली जाते. ही ३० मिनिटांची बहुपर्यायी चाचणी परीक्षा असते. या फेरीतून निवडले गेलेले विद्यार्थी दुसऱ्या फेरीस पात्र ठरतात आणि याही फेरीत वाढत्या काठिण्य पातळीसह परीक्षा घेतली जाते. या फेरीतून १० अंतिम स्पर्धक निवडले जातात. या सर्वांना व्यासपीठावर बोलावून हॉटसीटवर बसविले जाते आणि खास या स्पर्धेसाठी बनविण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली जाते.

या स्पर्धेतून सर्वोत्तम ठरलेल्या विद्यार्थ्यास ‘सीड आयटी आयडल’ हा किताब दिला जातो तसेच २ उत्तेजनार्थ विजेतेही निवडले जातात. त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे स्मार्टफोन्स, हार्डडिस्क्स, चार्जिंग पॉवर बँक्स तसेच ‘सीड’च्या कोर्सेसवर सवलत अशा गोष्टी पुरस्काराच्या रुपात प्रदान केल्या जातात. याच पद्धतीने सर्व केंद्रांवर स्पर्धा घेतल्या जातात आणि सर्व विभागीय ‘सीड आयटी आयडल’ विजेते नंतर ‘सीड महा आयटी आयडल’ स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ही महाअंतिम फेरी मार्च महिन्याच्या शेवटी पुण्यात आयोजित केली जाईल.

या उपक्रमाविषयी माहिती देताना ‘सीड इन्फोटेक’च्या कार्यकारी संचालिका, भारती बऱ्हाटे म्हणाल्या, “’सीड आयटी आयडल’च्या या यंदाच्या ९ व्या स्पर्धेलाही शिवाजी विद्यापीठाने सहकार्य देवू केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आणि कौशल्य आहे, फक्त ते जोखण्याची आणि त्यांना आयटी उद्योगात सहभागी होण्यासाठी सज्ज करण्याची गरज आहे, असे आम्हांस वाटते. गेल्या वर्षी या स्पर्धेत महाराष्ट्रातील ७०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि यावर्षीही राज्यभरातील ८०,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरखेरीज पुणे, मुंबई, बारामती, सांगली, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, कोकण, रत्नागिरी, अमरावती, नागपूर, धुळे व जळगाव यासारख्या शहरात ‘सीड आयटी आयडल’ उपक्रम राबविला जाणार आहे”, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!