कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी विद्यापीठ स्थापन करणार: कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर

 

कोल्हापूर  : कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका शासनाची असून राज्यात चंद्रपूर येथे कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता मिळाली असून राज्यातील प्रत्येक महसूल विभागात एक या प्रमाणे कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी आज येथे बोलताना केले.
कणेरी येथील श्री क्षेत्र सिध्दगिरी मठामध्ये आयोजित केलेल्या सिध्दगिरी कारागीर महाकुंभ सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या स्वयंपूर्ण ग्रामजीवनामध्ये कारागिरांचे योगदान या सत्राचा शुभारंभ राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने आज करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी गो संवर्धन, कृषी व ग्राम विकास मार्गदर्शक श्री ह्दयनाथसिंह हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कारागीर पंचायतीचे माजी अध्यक्ष नरेंद्रनाथ मेहरोत्रा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे डॉ. मनोज कुमार, श्री क्षेत्र सिध्दगिरी मठाचे मठाधिपती काडसिध्देश्वर स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्यात कौशल्य विकासाला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे सांगून कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर म्हणाले, कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यात येत असून त्याद्वारे तरुणांना रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कौशल्य विकासाला असलेले महत्व विचारात घेवून महाराष्ट्रास 6 कौशल्य विकास विद्यापीठे सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. चंद्रपुर येथे पहिल्या कौशल्य विकास विद्यापीठास मान्यता दिली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कारागिरी ही देशाची संपत्ती असून ती जतन करणे आणि वाढविणे काळाची गरज असल्याचे सांगून कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर म्हणाले, श्री क्षेत्र सिध्दगिरी मठाने जैविक शेती आणि कारागिरी या विषयांना प्राधान्य दिले असून ग्रामीण भागात कारागिरी निर्माण झाली पाहिजे यासाठी घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. कारागिरी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी श्री सिध्दगिरी मठाने कारागिर विद्यापीठ स्थापन करावे या विद्यापीठाच्या मान्यतेसाठी शासन पातळीवर आवश्यक ती मदत आणि सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
ग्रामीण भागाच्या आर्थिक परिवर्तनासाठी कारागिरीस अनन्य साधारण महत्व असल्याचे स्पष्ट करुन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर म्हणाले, कारागिरीतून ग्रामीण भागात मोठी रोजगार निर्मिती शक्य असून कारागिरांच्या उत्पादनाला बाजार पेठा उपलब्ध करुन देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. कारागिरीतून गावे संपन्न आणि समृध्द करण्याबरोबरच ती स्वयंपूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील कारागिरांच्या कला गुणांना आणि कौशल्य गुणांना प्रोत्साहन देवून रोजगार निर्मितीचे नवे दालन ग्रामीण भागात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्रीची व्यवस्था करुन शेतकरी आणि ग्राहकामधील दरी संपुष्टात आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या संकल्पनेतून शेतकरी समाधानी होवून गावेही स्वयंपूर्ण बनतील असा विश्वास व्यक्त करुन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर सिध्दगिरी मठाने कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेला हा महत्वकांक्षी आणि उपयुक्त उपक्रम आहे. यापुढील काळात मठाने गुरुकुल शिक्षण पध्दतीमध्येही पुढाकार घेवून गुरुकुल शिक्षण पध्दती विकसित करणे आहे. या उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी गो संवर्धन, कृषी व ग्राम विकास मार्गदर्शक श्री ह्दयनाथसिंह, राष्ट्रीय कारागीर पंचायतीचे माजी अध्यक्ष नरेंद्रनाथ मेहरोत्रा तसेच महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे डॉ. मनोज कुमार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले शेतकरी आणि कारागिरांना प्रोत्साहन देवून त्यांच्या कारागिरीच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तनाचं नवं दालन निर्माण करणे शक्य आहे. समृध्द, स्वयंपूर्ण गावांच्या निर्मितीसाठी कारागिरांच्या कलेला अधिक प्रोत्साहन देणे काळाचीगरज असल्याचेही या मान्यवरांनी स्पष्ट केले.
प्रारंभी श्री क्षेत्र सिध्दगिरी मठाचे मठाधिपती काडसिध्देश्वर स्वामी यांनी स्वागत करुन प्रस्ताविकात कारागीर महाकुभ सोहळ्याची संकल्पना विषद केली. प्रारंभी गो पुजन आणि दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या समारंभास मठाचे कार्यकारी संचालक आर.डी. शिंदे, कौशल्य विकास विकास विभागाचे सहायक संचालक श्री. करीम, वीभा गुप्ता, श्री. पी.डी.कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेतकरी, कारागिर, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी सिध्दगिरी कारागिर महाकुंभ सोहळ्यातील विविध स्टॉल्सना भेटी देवून पाहणी केली आणि ग्रामीण भागातील विविधांगी कारागिरींची माहिती घेतली. या कारागिरी महाकुंभामध्ये जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने कौशल्य विकास योजनेची माहिती देण्यासाठी लावलेल्या स्टॉल्सला कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी भेट दिली. कौशल्य विकास केंद्राचे सहायक संचालक श्री. करीम यांनी मंत्री महोदयांचे स्वागत करुन जिल्ह्यातील कौशल्य विकास योजनेची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थानच्या वतीने 75 हजाराचा धनादेश कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्याहस्ते मठाधिपती काडसिध्देश्वर स्वामी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!