
कोल्हापूर : भारतात बोन्साय कला वाढावी याबरोबरच या कलेचा उपयोग शेतीपूरक व्यवसाय म्हणून व्हावा या उद्देशाने पुण्यातील प्रसिद्ध बोन्साय कलाकार प्राजक्ता गिरीधर काळे यांच्या पुढाकाराने ‘बोन्साय नमस्ते’ या बोन्साय विषयक पहिल्या भव्य आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.प्राजक्ता काळे यांनी गेल्या ३५ वर्षात अथक परिश्रम करून बोन्सायची कला आत्मसात केली आहे.आणि संपूर्ण देशभरात बोन्साय व्यवसाय ही एक लोकचळवळ व्हावी आणि शेती पूरक जोडधंदा म्हणून शेतकरी बंधूनी याकडे वळावे यासाठी प्राजक्ता काळे या नेहमी प्रयत्नशील आहेत.त्यासाठीच येत्या २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान पुण्यातील सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ९ ते रात्री १० असून सदर प्रदर्शनास प्रवेश विनामूल्य असेल.अशी माहिती आदिशक्ती फाऊन्डेशनचे अध्यक्ष दत्ता पवार यांनी दिली. आदिशक्ती फाऊन्डेशन हि सामाजिक काम करणारी संस्था असून बोन्साय व्यवसायातून शेतक-यांना होणा-या लाभाची माहिती शेतक-यांपर्यंत पोहचावी या हेतूने आदिशक्ती फाऊन्डेशन या सामाजिक कार्यात सहभागी झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.प्राजक्ता काळे यांच्या संकल्पनेतून ‘बोन्साय नमस्ते’ या भारतात प्रथमच भव्यस्तरावर भरविण्यात येणा-या पहिल्या जागतिक परिषदेबाबत माहिती देताना ते म्हणाले की,वृक्षांविषयीच्या ‘बोन्साय’ या नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या जपानी कलेचे मूळ हे प्राचीन भारतीय संस्कृतीत ‘वामनवृक्ष कला’ या नावाने पहायला मिळते. बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबरच याचा जगभरात प्रसार झाला. जपानमध्ये याला कलेचा दर्जा मिळाला. त्यानंतर सर्वत्र ही कला ‘बोन्साय आर्ट’ म्हणून प्रसिद्धीस आली. भारतात या कलेचे मूळ असून देखील या कलेला फारसे प्राधान्य आणि व्यासपीठ मिळाले नाही. हेच लक्षात घेत भारतीय मूळ असलेली ही कला आपल्या देशात वाढावी, सर्वसामान्यांना त्याची माहिती व्हावी आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून याचा विचार व्हावा या उद्देशाने आम्ही ‘बोन्साय नमस्ते’च्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत.सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणात पिंपळाच्या पानाच्या आकारात साकारण्यात येणा-या या प्रदर्शनात एक हजारांहून अधिक बोन्साय एकाच ठिकाणी पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. ज्यामध्ये १० विभागात मामे,शोहीन, स्मॉल बोन्साय, मिडीयम बोन्साय, लार्ज व एक्स्ट्रा लार्ज बोन्साय अशा इतर अनेक प्रकारांचा समावेश असेल. ज्यामध्ये १ मीटर उंचीचे सर्वांत जुने १५० वर्षांचे उंबराचे बोन्साय आहे, तर ३ इंच उंचीचे बोन्साय हे सर्वांत लहान बोन्साय या ठिकाणी पहायला मिळणार आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी बोन्साय विषयक पुस्तकांचे एक ग्रंथालय देखील उभारण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बोन्साय नमस्ते या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतातील बोन्साय कलाकारांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ज्येष्ठ बोन्साय कलाकारांचे मार्गदर्शन विविध कार्यशाळांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. जगातील १६ विविध देशांतील बोन्साय कलाकार (मास्टर्स) या परिषदेत सहभागी होणार असून त्यात प्रामुख्याने बेल्जियम, इटली, इंडोनेशिया, जपान, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम आदी देशांमधील कलाकारांचा समावेश आहे. तसेच कृषी व फलोत्पादन महाविद्यालातील विद्यार्थ्यांना या कलेची ओळख व्हावी आणि त्याचा शेतीपूरक व्यवसायासाठी विचार व्हावा यासाठी काही विशेष प्रात्यक्षिके देखील आयोजित करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
भारतातील वातावरण व भारतात आढळणा-या वृक्षांच्या प्रजाती या बोन्साय कलेसाठी अत्यंत पोषक असून देखील याचा फारसा प्रसार भारतात झाला नाही याचे मुख्य कारण म्हणजे प्री बोन्साय मटेरियलची कमतरता. भारतात इतर देशांच्या तुलनेत बोन्साय कला जोपासणा-यांमध्ये स्त्री कलाकारांचे प्रमाण हे खूप जास्त आहे. शेतीशी संबंधित स्त्रीयांना यासंबंधीचे प्रशिक्षण दिल्यास प्री बोन्साय मटेरियलची निर्मिती अगदी सहज होऊ शकते, जी देश विदेशातील बोन्साय कलाकारांना उपलब्ध करून देता येईल. यामुळे शेतीपूरक व्यवसाय वाढीस चालना मिळेल.आज भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना बोन्साय कलेचा योग्य वापर केला तर शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून आपण याचा विस्तार करू शकतो. याबरोबरच भारतात असलेले वृक्षांचे अनेकविध प्रकार लक्षात घेत बोन्साय कलेच्या वाढीसाठी आपला देश एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरू शकतो. मात्र हे करीत असताना सातत्य आणि संयम हा महत्त्वाचा असल्याचेही दत्ता पवार यांनी यावेळी नमूद केले.बोन्साय म्हणजे निसर्गात आढळणा-या वृक्षांच्या लघु प्रतिकृतीच. बोन्साय करीत असताना वृक्षांबद्दलचे ज्ञान, फलोत्पादनाचे तंत्र आणि सर्जनशीलता यांच्या मदतीने निसर्गाचे संतुलन, साधेपणा आणि सुसंवाद साधण्याचा प्रयत्न कलाकार करीत असतो. बोन्साय या शब्दाचा अर्थ ‘बोन’ अर्थात कुंडी आणि ‘साय’ म्हणजे वृक्ष. म्हणजे कुंडीत वाढविण्यात येणारे वृक्ष असा होय. या कलेचे मूळ हे भारतीय संस्कृतीत आहे. पूर्वी आपले मुनी/ ऋषी, वैद्य विविध औषधे निसर्गातून घेत होते. पण ते वयोवृद्ध अथवा प्रवासात असताना त्यांना जंगलात जाणे शक्य नसायचे म्हणून ते हे वृक्ष घरी आणून झाडे कुंडीत वाढवू लागले. ही झाडे वर्षभर खुडत राहिल्यामुळे वैद्यांना वर्षभर त्याचा फायदा मिळे व झाडेही छोटी राहत. ही झाडे वामनासारख्या बुटक्या स्वरूपात दिसत असल्याने या कलेला ‘वामनवृक्ष कला’ असे नाव पडले.औषधोपचारासाठी असलेल्या या वृक्षांना हे ‘वामनवृक्ष’ अर्थात ‘बोन्साय’ असे नाव पडले. भारतातून बौद्ध धर्माबरोबरच या कलेचाही जगभर प्रसार झाला. जपानमध्ये याला ख-या अर्थाने कलेचा दर्जा मिळाला आणि नंतर जगभरामध्ये ती ‘बोन्साय आर्ट’ म्हणून प्रसिद्धीस आली. आज जगभरात या कलेचा प्रसार होत आहे. ही कला जोपासत असताना कलाकार आणि बोन्साय यांमध्ये एक नातेच जणू तयार होत असते. प्रत्येक कलाकार आपले बोन्साय हे आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर बनवीत असतो. त्यासाठी तो संयमाने अनेक वर्षे काम करीत असतो. हे करीत असताना ताणतणावापासून तुम्ही दूर तर जातातच याबरोबर निसर्गाच्याही जवळ जाता.
Leave a Reply