
कोल्हापूर : जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करुन सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविला जावा यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले.
जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरूण परीतेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, स्वयसेवी – सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
एचआयव्ही नियंत्रणासाठी जिल्ह्यात राबविण्यात येत असणाऱ्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असून एचआयव्ही संसर्गितांचे सरासरी प्रमाणही कमी होवू लागले आहे. एचआयव्ही प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी प्रभावी जनजागृती करण्याच्या कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, एचआयव्ही नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच सव्ंयसेवी, सेवा भावी संस्थाचे सक्रिय योगदान घ्यावे. जिल्ह्यात साखर कारखाना परिसरात ऊस तोडणी कामगार तसेच वाहनधारक, मजूर यांच्यातही एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.
जिल्ह्यातील आयजीएम इचलकरंजी आणि उप जिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे क्षयरोग तपासणीचे अद्ययावत उपक्रम (CBNAT) कार्यान्वित केले असून यामुळे क्षयरोग रुग्णांची निश्चितपणे सोय होणार आहे. या बरोबरच एचआयव्ही प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एचआयव्ही तपासणी व्यापक प्रमाणावर हाती घ्यावी. यामध्ये गरोदर स्त्रियांची प्रसुतीपूर्व एचआयव्ही तपासणी 100 टक्के करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करावे, अशी सूचनाही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.
जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गितांसाठी चार एआरटी सेंटर कार्यरत असून या सेंटरव्दारे एचआयव्ही संसर्गित रुग्णांना औषधोपचार करण्यात येत आहे. खाजगी रक्तपेढ्यामधून एचआयव्ही संसर्गित आढळल्यास त्यांना समुपदेशन, औषधोपचार या बाबी उपलब्ध करुन देण्याबाबत आयसीटीसीशी संपर्क साधावा, तसेच रक्तपेढ्यांनी याबाबतचे अहवाल दरमहा देणे बंधनकराक असल्याचेही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी यावेळी सांगितले.
एचआयव्ही संसर्गितांना सहाय्यभूत होण्याच्या दृष्टीने सामाजिक सहाय योजनेंतर्गत 1071 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून यामध्ये संजय गांधी निराधार योजनेसह अन्य योजनांचा समावेश आहे. यामध्ये एचआयव्ही संसर्गित लहान मुले, विधवा, अनाथ यांचा समावेश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात ग्राम संवेदना हा उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये एचआयव्ही टेस्टींग, हिमोग्लोबिन टेस्टींग तसेच गुप्त रोगाबाबतही तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात एचआयव्ही प्रतिबंधासाठी माहिती, शिक्षण आणि संपर्क याबाबींवर अधिक भर दिला असून गावो गावी जाणिवजागृती करण्यासह प्राधान्य दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रारंभी जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर यांनी स्वागत करुन समितीच्या कामकाजाची रुपरेषा सांगितली. शेवटी जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी आभार मानले. याबैठकीस सर्व एआरटी केंद्रांचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवी सेवाभावी संस्थांनचे पदाधिकारी, सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आदीजण उपस्थित होते.
Leave a Reply