
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात गेत्या तीन वर्षात स्वच्छतेची भरीव कामगिरी झाली असून या अभियानातून कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. यापुढे शहरी भागात घनकचरा निर्मुलन आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा प्राधान्यक्रमाचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले.
भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाच्यावतीने आणि कोल्हापूर विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने येथील मराठा रिजन्सीच्या सभागृहात आयोजित केलेल्या वार्तालाप माध्यम कार्यशाळेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला. याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास सकाळ समूह संपादक संचालक श्रीराम पवार, दै. लोकमत संपादक वसंत भोसले, माहिती उपसंचालक सतीश लळीत, पत्र सूचना कार्यालय मुंबईचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे, आकाशवाणीच्या सहायक केंद्र निर्देशक तनुजा कानडे, आयटी तज्ञ विनायक पाचलग, जेष्ठ संपादक दशरथ पारेकर, शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख रत्नाकर पंडित, विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक एस. आर माने आदीजण उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या प्राधान्य क्रमाच्या विविध विकास व कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत असलयाचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात भरीव काम झाले असून कोल्हापूर महानगरपालिकेसह आठ नगरपालिका आणि संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. हागणदारीमुक्तीची ही मोहिम जिल्ह्यात यापुढेही सातत्यपूर्ण राबविली जाईल. स्वच्छ भारत अभियानाच्या यापुढील टप्यात शहरातील घनकचरा निर्मुलन आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रभावी कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात येणार आहे. याउपक्रमांतर्गत नगरपालिका क्षेत्रात ओला आणि सुका कचरा साठविण्याची व विलगिकरणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. कागल नगरपालिकेने घनकचऱ्यापासून वीज निर्मितीचा महत्वकांक्षी उपक्रम यशस्वी करुन दाखविला आहे.
केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे 2022 अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात बेघरांना घर उपलब्ध करुन देण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात आला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, या योजनेंतर्गत लाभार्थींना घरासाठी 1 लाख 20 हजार, शौचालयासाठी 12 हजार आणि खोदकामासाठी 18 हजार असे अनुदान देण्यात येत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लाभार्थींना 5600 घरकुले देण्यात आली असून यावर्षी 1718 घरकुलांचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यातील 10 नगरपालिकामध्ये प्रधानमंत्री शहरी आवास योजना गतीमान करण्यात येत असून या योजनेंतर्गत झोपडपट्यांचा सर्व्हे करुन त्या जागेवर त्यांना घरकुल उपलब्ध करुन दिले जात असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, या योजनेसाठी लाभार्थींना 2 लाखाचे अनुदान देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेतील 64 झोपडपट्टयांचे सर्व्हेक्षण पूर्ण करुन प्रकल्प अहवाल शासनास सादर केला आहे. तर इचलकरंजी, कागल, वडगाव आदी नगरपालिकांमध्ये झोपडपट्यांचा सर्व्हे सुरु करण्यात आला असून लवकरच प्रकल्प अहवाल शासनास सादर केला जाईल. तसेच खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला असून कोल्हापूर महानगरपालिका तसेच इचलकरंजी व कागल नगरपालिकेमध्ये या कामास प्राधान्य दिले आहे.
शेती आणि शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाने राबविलेल्या विविध योजनांना जिल्ह्यात प्राधान्य दिले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, कृषि विभागामार्फत केंद्र पुरस्कृत 11 योजना राबविल्या जात असून यामध्ये जमिनीची आरोग्य पत्रिका देण्याचा महत्वाचा कार्यक्रम राबविला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी 41 हजार माती नमुन्याची तपासणी करण्यात आली असून 2 लाख 20 हजार आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. याबरोबरच राष्ट्रीय सुक्ष्म सिंचन अभियानांतर्गत उपलब्ध पाण्याचा योग्य विनियोग करण्यासाठी ठिबक सिंचनाचा भरीव कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यात 7 हजार हेक्टर क्षेत्रावर हा कार्यक्रम राबविला आहे. या उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियानांतर्गत कृषि यंत्रिकीकरणाला गती दिली असून या योजनेंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटा व्हेटर, मळणी मशिनसह अन्य औजारे उपलब्ध करुन देण्यासाठी 13 कोटी 46 लाखाचा तरतुद मंजूर करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्र पुरस्कृत योजनांना जिल्ह्यात प्राधान्य दिले असून बेटी बचाओ बेटी पढाओ, कर्जमाफी योजना, जलयुक्त शिवार अभियान, मुद्रा योजना अशा प्राधान्य क्रमाच्या योजनांची जिल्ह्यात परिणामकारक अंमलबजावणी करुन ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. यापुढील काळातही केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना अधिक गतीमान करुन विकासाच नवपर्व निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले. पत्र सूचना कार्यालयाच्यावतीने आयोजित केलेल्या वार्तालाप माध्यम कार्यशाळेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यास निश्चितपणे मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या विविध विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसार माध्यमांचा परस्पर संवाद वाढावा यासाठी आयोजित केलेल्या या वार्तालाप कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ संपादक, पत्रकारांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये प्रसार माध्यमांचे बदलते स्वरुप या विषयावर सकाळ समूह संपादक संचालक श्रीराम पवार, विकासात्मक पत्रकारीता -अपेक्षा व स्वरुप या विषयावर दै. लोकमत संपादक वसंत भोसले, सोशल मिडियावर- वरिष्ठ पत्रकार विनायक पाचलग, अत्पकालीन परिस्थितीत माध्यमांची भुमिका या विषयावर दशरथ पारेकर, प्राधान्य क्रमांच्या विकाय योजनांवर निवृत्त अधिव्याख्याते रत्नाकर पंडित यांनी मार्गदर्शन करुन उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.
पत्र सूचना कार्यालय मुंबईचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, पत्र सूचना कार्यालयाच्यावतीने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमाद्वारे केंद्र सरकारच्या विविध विकास व कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसार माध्यमांचा परस्पर संवाद वाढावा यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्या जिल्ह्यातून या उपक्रमासाठी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पत्र सूचना कार्यालयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. समारंभास मान्यवर वक्ते तसेच शहर व जिल्ह्यातील वृत्तपत्रांचे संपादक, प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मिडियांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply