श्री जोतिबा चैत्रयात्रा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार

 

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबाची यात्रा दिनांक 30,31 मार्च व 1 एप्रिल रोजी होत असून ही यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.
श्री. वाडीरत्नागिरी येथील एमटीडीसी रिसॉर्ट येथे देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर श्री केदारलिंग (श्री जोतिबा) देवस्थान चैत्र पोर्णिमा यात्रा- 2018 पूर्वनियोजन आढावा बैठक जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणार खेमणार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, प्रांताधिकारी अजय पवार, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, देवस्थान कमिटीच्या सदस्य शिवाजी जाधव, संगीता खाडे, सचिव विजय पवार, तहसिलदार रामचंद्र चौबे, गट विकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जोतिबा चैत्र पोर्णिमा यात्रा सुरळित आणि सुरक्षितपणे पार पडावी, यादृष्टीने सर्व यंत्रणांनी तयारी पूर्ण केली असून यापुढील काळात सर्व यंत्रणांनी अधिक सज्ज आणि सतर्क रहावे, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, यात्रा कालावधीत जोतिबा डोंगर येथे सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून काम करावे. देवस्थान समिती, महसूल, पोलीस, आरोग्य,सार्वजनिक बांधकाम,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,अन्न औषध प्रशासन, यांच्यासह सर्व विभागांच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहे. जोतिबा डोंगर येथे प्लास्टिक बंदी, खोबरे वाटी बंदी तसेच दुकानात अग्निशमन यंत्रे बंधनकारक केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगून, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, भाविकांसाठी चारचाकी तसेच दोन चाकीवाहनांसाठी स्वतंत्रपणे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच वाहतूक व्यवस्था, दर्शनरांग, बरॅकेटिंग, सुरक्षा व्यवस्था, पाणीपुरवठा व स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, विद्युत, रस्ते विकास आदि सर्व व्यवस्थांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली. या सर्व कामात प्रशासकीय यंत्रणांना विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून होत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, आरोग्य विभागाने पुरेसा औषधांचा आणि लसींचा साठा उपलब्ध करण्याबरोबरच ॲम्ब्युलन्स, स्ट्रेचर या गोष्टी प्राधान्यक्रमाने भाविकांना उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याची सूचना केली. भाविकांना पुरेसे आणि शुध्द पाणी उपलब्ध करुन देण्याबाबतही काळजी घ्यावी तसेच अन्न, औषध प्रशासन विभागाने हॉटेल्स, अन्न पदार्थांचे स्टॉल्स, दुकाने यांची तपासणी करावी, अनधिकृत गॅस सिलेंडर वापरले जाणार नाही, याचीही दक्षता घेण्याची सूचना त्यानी केली.
यात्रा कालावधीत आपत्ती व्यवस्थापण यंत्रणा अधिक दक्ष आणि सतर्क केली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, दर्शनरांग, गाभारा, मंदिर परिसर तसेच संपूर्ण जोतिबाडोंगर येथे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी, याकामी पोलीस तसेच सर्व शासकीय यंत्रणाबरेाबरच सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, परस्पर समन्वय ठेवून यात्रा यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, श्री जोतिबाची यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वोतोपरी उपयायोजना करण्यात आल्या असून श्री क्षेत्र जोतिबाच्या विकासासाठी आतापर्यंत 32 लाख इतका निधी खर्च करण्यात आला आहे. येत्या काळात यात्रेच्या नियोजनासाठी आणखी निधी लागल्यास तोही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत देण्यात येईल. तसेच भाविकांच्या सोईसाठी विविध सुचनांचे 25 फ्लेक्स यात्रा परिसरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून लावण्यात येतील, असे सांगून चैत्र यात्रेचे नेटके व सुयोग्य नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने त्यांनी अभिनंदन केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, जोतिबा यात्रेत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मनोभावी दर्शन मिळावे, त्यांना प्राथमिक सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची यंत्रणा याठिकाणी कार्यरत करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य, पाणी व कचऱ्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे याचे प्राधान्याने नियोजन करण्यात आले आहे. असे सांगून जोतिबा यात्रा शांततेत पार पडेल यासाठी प्रशासकीय यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!