पंचगंगा नदी प्रदुषण रोखण्यासाठी नदी काठावरील गावांनी सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रकल्प हाती घ्यावा: पालकमंत्री

 

कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी नदी काठावरील शहरे आणि गावांनी त्यांच्याकडील सांडपाणी नदीमध्ये मिसळणार नाही, यासाठी सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रकल्प हाती घ्यावा, यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत केली जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कोल्हापूर येथील पंचगंगा नदीघाट सुशोभिकरणाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आणि शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे, प्रभारी वास्तु शास्त्रज्ञ संजय गेडाम, कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नदीकाठावरील गावांनी साडपाणी व्यवस्थापनाचा विशेष प्रकल्प हाती घेवून प्रदुषण रोखण्याकामी मदत करावी, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पंचगंगा नदीमध्ये होणारे प्रदुषण रोखण्यासाठी शहर वासियांनी आणि गावकऱ्यांनी सक्रिय योगदान द्यावे. नदीमध्ये प्रदुषण होणार नाही यादृष्टीने जनावरे धुणे अशी कृत्ये टाळण्याची खबरदारी घ्यावी. नदीमध्ये प्रदुषण होणार नाही यासाठी खबरदारी घेवून पंचगंगा नदी स्वच्छ आणि प्रदुषण मुक्त कशी राहील याकामी शहर वासियांचेही योगदान मिळावे.
पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मितीला मोठी संधी असल्याने शेती बरोबरच आता पर्यटन विकासातही जिल्ह्यातील जनतेने सक्रिय होणे गरजेचे आहे, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पंचगंगा परिसर ऐतिहासिक असून हा परिसर पर्यटकांसाठी आकर्षक बनविण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. यासाठी 26 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून 5 कोटी रुपयांची कामांची सुरुवात केली आहे. पहिल्या टप्यात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र आणि बगिचा विकसित करण्यात येणार असून नजिकच्या काळात पंचगंगा घाट परिसर शहर वासियांची आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनेल यादृष्टीने याकामाला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या परिसरात पोहण्यासाठी येणाऱ्या नागरीकांसाठी स्वतंत्र टॉयलेट आणि चेजिंगरुम तसेच या परिसरातील दिपमाला व जुन्या मंदिरांच सुशोभिकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
पर्यटन वाढीसाठी जिल्ह्यात 15 एप्रिल पासून 2 महिने पर्यटन सहलींचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आठवड्यातून दोन दिवसांची एक सहल आयोजित केली जाणार असून यामध्ये जिल्ह्यातील नवीन आठ पर्यटनस्थळे पर्यटकांना दाखविली जाणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या पर्यटकांची राहण्याची, भोजनाची, वाहतुकीची व्यवस्था केली जाईल. यातून पर्यटन विकासाला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठी संधी असून पंचगंगा घाटाबरोबरच रंकाळ्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच राधानगरीत फुल पाखरांचे गार्डन विकसित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
शहरी व ग्रामीण भागात जनतेसाठी पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्याबरोबरच प्रत्येक माणूस सुखी, आनंदी आणि सुरक्षित करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकांना सुखी आणि आनंदी करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. तसेच लोकांची मानसिकता बदलून सकारात्मक दृष्टी निर्माण करण्याचाही प्रयत्न आहे. यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहे. जिल्ह्यात शेती विकास, पर्यटन विकासा बरोबरच औद्योगिक विकासालाही प्राधान्य दिले असून 5 हजार तरुणांना असा मोठा औद्योगिक प्रकल्प जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
शाहू महाराज छत्रपती याप्रसंगी बोलताना म्हणाले, पंचगंगा नदीघाट सुशोभिकरणा बरोबरच नदी प्रदुषणाचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. याकामी शासनाने पुढाकार घेवून पंचगंगा नदी शुध्दीकरणाचे काम हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, पंचगंगा नदीघाट परिसराचा दर्जेदार विकास करुन हा परिसर सुशोभित करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. घाटाचे सौंदयीकीकरण तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठी विरंगुळा केंद्र प्राधान्याने पूर्ण होईल. याबरोबरच पंचगंगा नदी प्रदुषणाचा सर्वार्थाने महत्वाचा प्रश्न असून नदी शुध्दीकरणासाठी शासनस्तरावर आवश्यक तो प्रकल्प राबविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी या परिसराची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करुन राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती घेतली. या समारंभास जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार उत्तम दिघे, बांधकाम विभागाचे उप अभियंता बी.एम. उगले महापालिका स्थायी समिती अध्यक्ष अशिष ढवळे, संदिप देसाई, नगरसेवक विजय सुर्यवंशी, किरण नकाते, किरण शिराळे, रुपाराणी निकम, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे‍ विजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!