
राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या ‘ख्वाडा’ सिनेमात भाऊसाहेब शिंदेने साकारलेल्या रांगड्या गडीची चर्चा सर्वत्र झाली. ‘ख्वाडा’ दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे लिखित आणि दिग्दर्शित तसेच द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत व चित्राक्ष फिल्म्स निर्मित ‘बबन’ या सिनेमातून तो येत्या २३ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रासमोर येणार आहे. स्वभावाने लाजाळू आणि मितभाषी असलेला भाऊराव ‘बबन’चे नाव काढले कि, भरभरून बोलू लागला.
‘ख्वाडा’ चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भाऊंनी मला‘बबन सिनेमा तूच करतोयस’ असं थेट सांगून टाकलं. ‘ख्वाडा’मधील माझी भूमिका एकदम रांगडी होती. तसेच तो मितभाषी, स्वप्नाळू, लाजाळू होता. माझा स्वभावही थोडा फार तसाच असल्यामुळे ती व्यक्तिरेखा साकारणं मला तसं सोपं गेलं होतं. परंतु, ‘बबन’ची व्यक्तिरेखा ‘ख्वाडा’च्या तुलनेत खूप वेगळी आहे. ही भूमिका रोमँटिक आहे. ‘ख्वाडा’मधला नायक हा वडिलांच्या दबावाखाली होता, तर या‘बबन’मधील नायक मोठ्या इच्छाशक्तीचा आहे. त्यामुळे या दोन्ही व्यक्तिरेखा गावराण असल्या, तरी भिन्न आहेत. ‘बबन’ मधील रोमँटिकभूमिकेचे मोठे आव्हान माझ्यापुढे होते. मी ग्रामीण भागात वाढलो असून मुलांच्या शाळेत शिकलो आहे. पुढे कॉलेजमध्येदेखील मुला-मुलींचे बसण्याचे बेंचेस वेगळे असल्यामुळे मुलींसोबत कधी बोलण्याची वेळच आली नव्हती. त्यामुळे ऑनस्क्रीन रोमान्स करणे अवघड गेले. माझा लाजाळू स्वभाव भाऊरावला माहित असल्यामुळेत्याने गायत्रीबरोबर माझं ‘बॉण्डिंग’ होण्यासाठी खूप प्रयत्न केलेअसल्याचे भाऊसाहेब सांगतो. त्यासाठी दिग्दर्शकाच्या सांगण्यानुसार,जवळपास चार-पाच महिने गायत्री जाधवबरोबर भाऊसाहेबाला एकत्र फिरावे लागले होते. त्यामुळे मुलींबद्दलची वाटणारी भीती त्याची कमी झाली.
एका रोमँटिक सिनच्या चित्रीकरणाचा भन्नाट किस्सा इथे भाऊसाहेब सांगतो. ‘आमचं तळ्यात शूटिंग होतं. गायत्रीला पाण्याची खूप भीती वाटत होती. तसेच, एकदा गव्हाच्या शेतात गाण्याचे शुटींग करत असताना माझ्यामुळे ती गव्हाच्या कुसाळात पडली होती, त्यामुळेतळ्यातील तराफ्यातही मी तिला पाडीन अशी तिला भीती वाटत होती. मग भाऊरावनी समजूत काढल्यानंतर आमचं ते शूटिंग पूर्ण झालं. चिखलाच्या खड्ड्यामधील सीनमध्ये काम करताना खूप त्रास झाला. चिखलात उडी घेताना गायत्री डोळे उघडेच ठेवायची. त्यामुळे डोळ्यात चिखल जाऊन ते सुजायचे. या सीनचे जवळजवळ १३ रीटेक्स झाले. दुपारी १२ वाजता सुरू झालेला सीन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालला. असा आमचा पडद्यावरचा ‘रोमान्स’ मग प्रेक्षकांसमोर खूप मेहनतीने रंगला’.
या सिनेमासाठी भाऊरावला त्याचे वजनदेखील कमी करावे लागले.लहानपणापासून दुधाची सवय असल्यामुळे जेवणात दूध वर्ज्य करणे त्याला खूप अवघड गेले. व्यवसायाने शेतकरी असलेल्या भाऊसाहेबला एक वेळ ताटात भाजी नसली तरी चालेल, पण दूध आणि भाकरी ही लागायचीच. दुधाच्या फॅट्समुळे वजन कमी होत नव्हतं. त्यामुळे दुधावरचा उतारा म्हणून त्याने पळायला सुरुवात केली. दररोज पाच किलोमीटर तो धावत असत.‘ख्वाडा’ चित्रपटामुळे एका रात्रीच स्टार बनलेल्या भाऊसाहेबाला, ‘बबन’ हा सिनेमा खूप महत्वाचा आहे. सामान्य शेतकरी कुटुंबीयात वाढलेल्या भाऊसाहेबची स्वप्न खूप मोठी आहेत ‘साज ह्यो तुझा’ हे गाणं ‘सोशल मीडिया’वर पहिल्यांदा झळकलं तेव्हा भाऊसाहेबांनी सर्वात पहिला फोन त्याच्या आईला केला होता, त्यांनी तिला तेपाहायला सांगितलं. तेव्हा त्यांची आई म्हणाली, ‘मी आता वांगी खुरीपतेय. तू मला नंतर फोन कर.’ असा एक मजेशीर किस्सा भाऊसाहेब सांगतात.
Leave a Reply