
कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा चैत्र यात्रे निमित्त सहजसेवा ट्रस्टच्यावतीने श्री क्षेत्र जोतिबा गायमुख येथे मोफत अन्नछत्रचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 29 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत हे मोफत अन्नछत्र दिवस-रात्र सुरू राहणार असल्याचे सहजसेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मत्ति मिरजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यात्रेकरूंची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन गेली महिनाभर ट्रस्टच्यावतीने तयारी सुरू केली असल्याचेही मिरजे यांनी सांगितले.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री जोतिबा यात्रेस 31 मार्च पासून प्रारंभ होत आहे. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातून भाविक येतात. दरम्यान या भाविकांची अन्नाबाबत कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सहजसेवा ट्रस्टच्यावतीने गेली सतरा वर्षे श्री क्षेत्र जोतिबा इथं मोफत अन्नछत्रचे आयोजन केले जात आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मोफत अन्नछत्रचे आयोजन गायमुख इथे करण्यात आले आहे. 29 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत हे अन्नछत्र दिवस-रात्र सुरू राहणार असून याचा भाविकाने लाभ घ्यावा असे आव्हान मिरजे यांनी केले.
यात्रेदरम्यान भाविकांची संख्या जास्त असल्याने शासनामार्फत आरोग्य सेवा केंद्रही उभारण्यात येणार असून ग्रामीण भागातील लोकांना रक्तदानाचे महत्त्व कळावे यासाठी चार दिवस रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे यासाठी स्वतंत्र मंडप उभारणी करण्यात अली असल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले. चार दिवस चालणाऱ्या या मोफत अन्नछत्रसाठी ज्या लोकांना, सेवाभावी संस्थांना सढळ हाताने मदत करायची आहे, त्यांनी शाहूपुरी, आशिष चेंबर्स येथील सहज सेवा ट्रस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस सूर्यकांत गायकवाड, लक्ष्मण पटेल यांच्यासह सेवा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply