नियोजनबद्ध जोतिबा यात्रेसाठी जोतिबा डोंगर सज्ज: महेश जाधव

 

कोल्हापूर: वाडी रत्नागिरी ता पन्हाळा येथील श्री केदारलिंग म्हणजे श्री जोतीबाची चैत्र यात्रा ३१ मार्च रोजी होत आहे.नियोजनबद्ध ,उत्साहात आणि सुरळीत यात्रा पार पडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सज्ज आहे अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
समितीकडून धार्मिक कार्याची सर्व तयारी,मंदिराचे रंगकाम, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने २८ सीसीटीव्ही कॅमेरे,२ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर तसेच १५० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. दर्शनासाठी शिवाजी पुतळ्याजवळ आणि रामलिंग मंदिरापासून देव बाव पर्यंत तात्पुरता ओव्हर ब्रीज भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आला आहे. रांगेतील भाविकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी पश्चिम दरवाजा ते शिवाजी पुतळा या मार्गावर मंडप व्यवस्था तसेच दगडी फारशी गरम होऊन पायाला चटके बसू नये म्हणून कुल कोट लावण्यात आले आहे. १४५ शौचालय, एक कोटी लिटर पाण्याची व्यवस्था,४ स्क्रीन,४५ हॅलोजन, वीज पुरवठा खंडित झाला तर ४ फिरते जनरेटर,४२ केव्ही जनरेटर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात पुरेशी फॅन व्यवस्था, दर्शन मंडपात स्मोक एक्स्ट्राक्टर बसविण्यात आले आहे.आरोग्य सुविधा यामध्ये तज्ञ डॉक्टर्सची टीम,अग्निशमन यांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.प्लस्टिक बंदी मुळे दुकानदारांना प्लास्टिक पिशव्या वापरू नयेत अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दुचाकी पार्किंग पासून डोंगरावर येण्यासाठी ४० केएमटी बसेस द्वारा मोफत सेवा पुरविण्यात येणार आहे, तरी शिवाजी पुलावरून अवजड वाहतुक बंद असल्याने शिये, कोडोली, गिरोली मार्गे डोंगरावर येण्यासाठी वाहतूक सुरू राहील असे आवाहन परिवहन शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
यात्रा दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. पहाटे ५ वाजता शासकीय पूजा आणि दुपारी बारा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते पालखी पूजन सासन काठी पूजन सोहळा संपन्न होणार आहे.
तसेच व्हाईट आर्मी,क्रांती संघटना,रोटरी क्लब,टू व्हीलर असोसिएशन सारख्या सेवाभावी संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे असेही महेश जाधव यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला सदस्या सौ. संगीता खाडे, प्रमोद पाटील,विजय पोवार,महादेव दिंडे, वाहतूक शाखा अधिकारी अशोक धुमाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!