
कोल्हापूर : जयलक्ष्मी वैष्णवी फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत, भानुदास व्यवहारे आणि दत्तात्रय मोहिते दिग्दर्शित, तुला पण बाशिंग बाधायचंय, हा चित्रपट येत्या 30 मार्चला राज्यभरात प्रदर्शित होतोय. महिलांच्या प्रश्नांवर भाष्य करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवेल, असा विश्वास निर्माते भानुदास व्यवहारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर भाष्य करणारे चित्रपट हाताळले जात आहेत. वैशिष्ट्य म्हणजे हे अनेकविध विषय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. सादरीकरणातील विविधतेमुळं मराठी चित्रपटांना चांगलं यश मिळतंय. भानुदास व्यवहारे आणि दत्तात्रय मोहिते यांनी, तुला पण बाशिंग बांधायचंय, या चित्रपटाची निर्मिती केलीय. वर्षा आणि आकाश या तरुण जोडप्याची कथा या चित्रपटातून दर्शवलीय. लग्नानंतर दोघांच्या आयुष्याला अचानक मिळालेली कलाटणी, त्यानंतर वर्षा आणि आकाश यांच्या आयुष्यात येणारं वेगळं वळण, या चित्रपटाच्या कथेतून दर्शवण्यात आलंय. या चित्रपटाच्या माध्यमातून वैवाहिक आयुष्यातील समस्या, मुलामुलींच्या अपेक्षा, त्यांच्या आईवडिलांचे दृष्टीकोन, सामाजिक मानसिकता असे वेगवेगळे विषय हाताळण्यात आलेत. भानुदास व्यवहारे यांच्या लेखणीतून साकारलेल्या चित्रपटातील गीतांना संगीतकार एग्नेल रोमन यांनी संगीतसाज चढवलाय. वैशाली माढे, सुहास सावंत, प्रसन्नजित कोसंबी यांनी चित्रपटातील गीतं गायली आहेत. या चित्रपटात विक्रम गोखले, सुरेश विश्वकर्मा, यतीन कार्येकर, सुनील गोडबोले, भक्ती चव्हाण, श्वेता खरात, सुवर्णा काळे, रितेश नगराळे, राहुल पाटील यांच्यासह विविध कलाकारांनी काम केलंय. कथा, पटकथा, संवाद भानुदास व्यवहारे यांचे आहेत. सिद्धेश मोरे यांनी छायांकन केले आहे. तर माधव शिरसाट यांचं संकलन आहे.
Leave a Reply