श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी; विधानसभेत विधेयक मंजूर

 

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी व सरकारी पुजारी नेमण्याबाबतचे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर झाले. आता हे विधेयक विधान परिषदेत मंजुरीसाठी जाणार असून, तेथे सर्वानुमते मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राज्यपालांच्या सहीसाठी जाईल.राज्यपालांची सही झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. दरम्यान, अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने याबाबत सर्वांचे अभिनंदन केले असून उद्या आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. मंदिरात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर बडवे हटवून सरकारी पुजारी नेमावेत, यासाठी जून महिन्यापासून येथे आंदोलन तीव्र झाले. हिवाळी अधिवेशनात याबाबत कोणताच निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष होते. काल विधिमंडळात श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदीर कोल्हापूर विधेयक मांडण्यात आले. त्याला आज विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर मंदिरात असलेल्या पुजाऱ्यांचे हक्क संपुष्टात येणार आहेत. राज्यस्तरीय परीक्षा घेवून मंदिरातील पुजाऱ्यांची नेमणूक होणार आहे. त्यात पन्नास टक्के महिलांनाही संधी दिली जाणार आहे.
शाहू वैदीक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मंदिरातील नेमणुकीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. याबाबत संघर्ष समितीचे आनंद माने म्हणाले, एकीकडे आंदोलन सुरू असताना निशिकांत मेथे यांच्यासह आम्ही न्यायालयात दावा दाखल केला होता. पंढरपूरप्रकरणी पंचवीस वर्षे न्यायालयीन लढाई सुरू होती. त्यात सर्वोच्च न्यायालयाने देवस्थान समितीला पुजारी नेमण्याचे अधिकार दिले असून याच आधारावर दावा दाखल केला. विधानपरिषदेत विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांच्या सहीनंतर हा कायदा लागू होईल.” पगारी पुजारी असावेत अशी कोल्हापूर कारांची इच्छा होती ती पूर्ण झाली अश्या प्रतिक्रिया श्री अंबाबाई भक्तांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!